अमित शाह हे मराठी माणसांचे क्रमांक एकचे शत्रू : ठाकरे गटाची टिका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | चणे-फुटाणे विकत घेतात त्याच प्रमाणे निवडणूक आयोगाचा निकाल विकत घेण्यात आल्याचे सांगत ठाकरे गटाने अमित शाह हे मराठी माणसांचे क्रमांक एकचे शत्रू असल्याची घणाघाती टिका केली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतल्यानंतर उध्दव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी सातत्याने निवडणूक आयोगासह भाजप आणि शिंदे गटाला लक्ष्य केले आहे. आज दैनिक सामनाच्या अग्रलेखात याच मुद्यावरून अतिशय तिखट भाष्य करण्यात आले आहे.

या अग्रलेखात म्हटले आहे की, ठाकर्‍यांनी स्थापन केलेला शिवसेना हा पक्ष त्यांच्याकडून काढून घेतला व बाळासाहेब ठाकरे यांच्या देवघरात पुजला जाणारा धनुष्यबाणही चोरून दिल्लीचे तळवे की आणखी काही चाटणार्‍यांच्या हाती ठेवला तो कोणत्या बहुमताच्या आधारावर? हा प्रकार बेबंदशाहीचा आहे आणि बेबंदशाहीवाले महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवरायांवर फुले उधळतात हा तर महाराष्ट्र आणि शिवरायांचा अपमान आहे. मोदी युग संपले आणि बाळासाहेब ठाकरे आणि त्यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेशिवाय महाराष्ट्रात भाजपला कुत्रेही विचारणार नसल्यानेच त्यांनी शिवसेनेवर दरोडा टाकला आणि आपले तळवे चाटणार्‍या मिंध्यांना मुख्यमंत्री केले. हिंदुत्वरक्षक, मराठी माणसाचा मानबिंदू असलेल्या शिवसेनेचे अस्तित्वच नष्ट करणारा हा निकाल महाराष्ट्राला मान्य नाही. न्याय झाला नाही आणि निकाल विकत घेतला. व्यापार्‍यांच्या राज्यात दुसरे काय होणार? लढाई सुरूच राहील!

यात पुढे नमूद केले आहे की, ‘शिवसेना’ हे नाव आणि चिन्ह विकत घेतल्यानंतर भाजपची कमळी पायातले घुंगरू तुटेपर्यंत नाचत आहे. मिंधे गटापेक्षा भारतीय जनता पक्षालाच आनंदाचे भरते आले आहे. एखाद्या दुकानातून चणे, शेंगदाणे विकत घ्यावेत, अशा पद्धतीने शिवसेना हे नाव आणि चिन्हाबाबतचा ‘निकाल’ विकत घेतला हे आता लपून राहिलेले नाही. मिंध्यांना धनुष्यबाणाचे चिन्ह मिळाले ते याच अमित शाहांच्या मेहेरबानीने हे काय आता लपून राहिले? हा माणूस महाराष्ट्र व मराठी माणसाचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. त्यामुळे श्रीमान शाहांच्या कच्छपी लागून जे स्वतःचा राजकीय कंडू शमवीत आहेत, त्या सगळ्यांना महाराष्ट्राचे दुष्मन मानावे लागेल.

प्रतिज्ञापत्रे ‘ट्रक’ भरूनपाठवली, त्यांना किंमत नाही? शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, उपनेते यांच्या प्रतिज्ञापत्रांना मोल नाही? शिवसैनिकांनी ज्यांना निवडून आणले त्यांची डोकी मोजून धनुष्यबाण आणि पक्षाच्या स्वामित्वाचा निकाल देणे ही घटनेशीच बेइमानी आहे. बेइमान आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने त्यांचा निकाल थांबवायला हवा होता. उद्या एखादा अदानी, अंबानी, नीरव मोदी उठेल आणि अशा प्रकारे आमदार खासदारांना विकत घेऊन संपूर्ण पक्षावर, सरकारवरच मालकी हक्क सांगेल. देशातली सरकारे रोज पत्त्याच्या बंगल्यासारखी पाडली जातील. महाराष्ट्रात किमान दोन हजार कोटींचा सौदा करून आधी सरकार विकत घेतले आणि आता धनुष्यबाणाचा, शिवसेना नावाचा सौदा करण्यात आला. ही कसली लोकशाही? असा सवाल या अग्रलेखात विचारण्यात आला आहे.

Protected Content