फैजपूर, ता. यावल प्रतिनिधी । पालकांनी आपल्या पाल्याची आवड निवड समजून त्यांना करियरची दिशा द्यावी, यासाठी प्रत्येकाने डीएमआयटी चाचणी करून घेऊन आपल्या पाल्याचा बुध्यांक आणि करियर विषयक कल जाणून घ्यावा असे आवाहन अमित राठी यांनी केले. ते येथील कार्यक्रमात बोलत होते.
आज लोकसेवक बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांचा जन्मदिवस. कै बाळासाहेब यांचे महाराष्ट्राच्या शिक्षण आणि समाज क्षेत्रातील योगदान विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन स्मार्ट स्किल, नाशिक आणि धनाजी नाना महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने रविवारी धनाजी नाना महाविद्यालयात करियर गायडन्स आणि डीएमआयटी सेमिनार आयोजित करण्यात आले. यात राष्ट्रीय वक्ता आणि देशभरात ज्यांनी ३०० हुन अधिक सेमिनार यशस्वी करून दाखविले आहेत असे डीएनआयटी चाचणी करून समुपदेशन करणारे अमित राठी यांनी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील दहावी आणि बारावी नंतर करियर च्या विविध संधी ध्येय निश्चिती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणि आत्मविश्वास कसा वाढवावा यासंबंधी मार्गदर्शन दृक श्राव्य साधनांच्या माध्यमातून सादरीकरण केले.
हा सेमिनार इयत्ता ६ वी ते १२ वी च्या विद्यार्थी आणि पालकांसाठी होता. यात विशेष करून डीएमआरटी या शास्त्रीय बुध्यांक मापन शास्त्रीय पद्धतीवर भर देण्यात आला. ही पद्धत चार वर्ष वयापासून पुढील मुलांसाठी लाभदायक असून बुध्यांक व्यक्तिमत्त्व, योग्य करियर ची निवड, शिकण्याची पात्रता, ए टी डी प्रतिसाद देण्याची वेळ, मेंदूच्या कार्यशैली बद्दल विषयत्वे वापरण्यात येते.
या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ पी. आर. चौधरी यांनी केले. यानंतर कै. मधुकरराव चौधरी यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. अध्यक्षीय समारोपात शिरीषदादा चौधरी यांनी आपल्या अपेक्षेनुसार मुलांनी वागण्याचा हट्ट न करता त्यांच्या कलेने त्यांना आयुष्य जगू द्या. कामाचा आनंद मनापासुन घेतला पाहिजे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाला तापी परिसर मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिरिष चौधरी, शेखर पाटील, उपाध्यक्ष दामोदर हरी पाटील, चेअरमन लिलाधर विश्वनाथ चौधरी, सचिव प्रा एम टी फिरके, प्रा पी एच राणे, अरुणाताई चौधरी, धनंजय चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ पी आर चौधरी, उपप्राचार्य प्रा डॉ अनिल भंगाळे, उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा वंदना बोरोले, प्रा. डॉ राजश्री नेमाडे, प्रा कविता भारुडे, मिलन महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन एनसीसी अधिकारी प्रा लेफ्टनंट राजेंद्र राजपूत यांनी केले. यावेळी पालक सन्मा. प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, नितिन सपकाळे, शेखर महाजन, चेतन इंगळे,प्रकाश भिरुड, पराग राणे, एनसीसी कडेट्स आदींचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभत आहे.