नियमबाह्य कर्जवसुली करणार्‍या बँका व वित्तीय संस्थावर कारवाई करा- मनसे

यावल प्रतिनिधी । कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन करण्यात आले असून या काळात यावल तालुक्यातील बँका आणि खाजगी वित्तीय संस्था कर्जदारांकडून कर्ज वसुलीचा तगादा लावत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.

store advt

लॉकडाऊन सुरू असतांनाही यावल तालुक्यातील बँका आणि खाजगी वित्तीय संस्था कर्जदारांकडून कर्ज वसुलीचा तगादा लावत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना यावल यांनी यावल तहसीलदार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना अशा खाजगी वित्तीय संस्था व बँकांवर कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन दिले आहे. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्र राज्यात व संपूर्ण देश मागील चार महिन्यांपासून कोरोना सारख्या आपत्तीमुळे संपूर्ण देशात होरपळला जात आहे. तर दुसर्‍या बाजूने राज्यातील व तालुक्यातील विविध बँका आणि खाजगी वित्तीय कर्जपुरवठा करणार्‍या संस्था या शासनाचे व न्यायालयाचे सर्व नियम धाब्यावर बसवून कर्जदारांना धमकावून सक्तीची कर्ज वसुली करीत असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक आपल्या देशाच्या रिझर्व बँकेने स्पष्ट निर्देश दिले आहे की लॉकडाऊन च्या काळात कुठल्याही कर्जदाराकडून कोणत्याही प्रकारची कर्जवसुली व कर्ज त्याचे व्याज देखील वसूल करू नये. अशा असताना बँक आणि वित्तीय कर्जपुरवठा करणार्‍या खाजगी संस्था या कर्ज धारकांशी मनमानी व मुजोरी करून सक्तीची कर्ज वसुली करीत असल्याचे निदर्शनात आले असून ही गंभीर बाब आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, तालुक्यातील अतिशय अल्प असे कर्ज घेणार्‍या बचत गटा सारख्या लहान कर्ज धारकांना शासनाच्या आर्थिक मदतीची गरज असून राज्य शासनाने तात्काळ राज्यातील अल्प कर्ज किती करणार्‍या खाजगी वित्तीय संस्था व बँका यांना आदेश देऊन ही सक्तीची कर्ज वसुली थांबवावी. तसेच त्यांना मदतीचा हात द्यावा या कोरोना संसर्ग संकटाच्या काळात होत असलेल्या सक्तीच्या कर्जवसुलीमुळे अनेक नागरिकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. अशा प्रसंगी कोणाचे जीवाचे कमी-जास्त झाल्यास या सर्व प्रकाराला बँका आणि खाजगी वित्तीय संस्था याच जबाबदार राहतील. अशा संस्थांवर राज्य शासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष चेतन अढळकर, तालुका सचिव संजय नन्नवरे वीरेंद्र राजपूत, अजय तायडे आबिद कच्ची, किशोर नन्नवरे, साहिल बडगुजर, अमोल बाविस्कर, शाम पवार आणि धनराज चौधरी यांनी हे निवेदन नायब तहसीलदार आर. डी. पाटील व कोषागार अव्वल कारकून मुक्तार तडवी यांना दिले.

error: Content is protected !!