Home प्रशासन यावल तालुक्यात गुटखा व भेसळयुक्त पदार्थांची खुलेआम विक्री? कारवाईची मागणी

यावल तालुक्यात गुटखा व भेसळयुक्त पदार्थांची खुलेआम विक्री? कारवाईची मागणी

0
8


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कथित दुर्लक्षामुळे प्रतिबंधित गुटखा, संशयित दर्जाहीन खाद्यपदार्थ आणि विविध जीवनावश्यक वस्तूंची खुलेआम विक्री होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. नियमित तपासणीचा अभाव आणि नियमांच्या अंमलबजावणीत होत असलेल्या कथित शिथिलतेमुळे ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून संबंधित विभागाने तातडीने विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.

मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यांच्या सीमेलगत असलेल्या यावल तालुक्यात बाहेरील भागांतून विविध खाद्यपदार्थ आणि इतर वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणल्या जात असल्याचे सांगितले जाते. मात्र या वस्तूंची गुणवत्ता, वैधता आणि अन्न सुरक्षा निकषांची पूर्तता होत आहे की नाही, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित विषय असल्याने या प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, तालुक्यातील काही किराणा दुकाने तसेच मोठ्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. काही ठिकाणी अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचे तसेच भेसळयुक्त दूध आणि इतर वस्तू विकल्या जात असल्याचे आरोपही करण्यात येत आहेत. अन्नपदार्थांच्या साठवणुकीचे निकष, स्वच्छता आणि गुणवत्तेची तपासणी नियमितपणे होणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यावल तालुक्यात गुजरात आणि मध्य प्रदेशातून प्रतिबंधित गुटख्याची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची लाखो रुपयांची उलाढाल खुलेआम सुरू असून संबंधित यंत्रणांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. या आरोपांची स्वतंत्र चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणीही पुढे येत आहे.

यावल तालुका हा दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा भाग असल्याने येथे विविध प्रकारच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर वाहतूक आणि विक्री होत असते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष दक्षता बाळगून नियमित तपासण्या करणे आवश्यक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते आणि ग्राहक संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर अन्न सुरक्षा आणि ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीने अधिक कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. यावल शहरासह ग्रामीण भागात विशेष तपासणी मोहीम राबवून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक स्तरावर जोर धरत आहे.


Protected Content

Play sound