अमळनेरचे उद्योगपती विनोद पाटील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

अमळनेर प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्याचे शिक्षण महर्षी, कृषिरत्न आणि भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची १२३ वी जयंती नुकतीच २०२१ मध्ये अकोला येथे साजरी करण्यात आली. दरम्यान, सोहळ्यात अमळनेर येथील आर.के.पटेल उद्योग समुहाचे मालक व माजी नगराध्यक्ष विनोद पाटील यांना प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, पिंप्री चिंचवड मनपा उपायुक्त अण्णासाहेब बोदडे, शिवाजी लोक विद्यापीठाचे महासंचालक मंगेश देशमुख, नेहरू पार्कचे संचालक बी.एस.देशमुख यांच्या हस्ते विनोदभैय्या पाटील यांना “जिवन गौरव” पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळ्यासाठी कृषी, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते. राज्यातील विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या मान्यवरांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.

विशेष म्हणजे पुरस्काराची कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ सामाजिक दातृत्व म्हणून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अमळनेर येथून उद्योगपती विनोद पाटील यांची निवड होऊन त्यांना जीवन गौरव पुरस्कार बहाल करण्यात आला. यावेळी प्रस्तावना करतांना जेष्ठ रंगकर्मी प्रा.मधू जाधव यांनी पुरस्काराचे प्रयोजन व पुरस्कारासाठी निवड झालेल्या विनोदभैय्या पाटील यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला. प्रकाश अंधारे यांनी त्यांना देण्यात येणाऱ्या मानपत्राचे वाचन केले. तर सूत्रसंचालन धनंजय मिश्रा यांनी केले. याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांनी विनोद पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या पुरस्काराबद्दल अमळनेर परिसरातूनही त्यांचे अभिनंदन होत आहे.

दरम्यान विनोदभैय्या पाटील म्हणजे अमळनेर नगरीतील असामान्य, क्रियाशील, दातृत्ववान आणि कर्तृत्ववान व्यक्तीमत्व असून आर.के.पटेल अँड कंपनी टोबॅको प्रोसेसर्स आणि मे.अशोक टॉबेको प्रोसेसिंगचे उत्पादक आहेत. अमळनेरात खान्देश शिक्षण मंडळ, अमळनेर अर्बन बँक आदी संस्थांवर अनेक वर्षे प्रतिनिधित्वच नव्हे तर गटाचे नेतृत्वही केले आहे.

अमळनेर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद त्यांनी चांगल्या पद्धतीने सांभाळले आहे. प.पू.भय्युजी महाराज यांच्या उपस्थितीत अमळनेर येथे 101 जोडप्यांचा सामूहिक विवाह स्वखर्चाने त्यांनी आयोजित करून यशस्वी केला होता. याव्यतिरिक्त पाडवा पहाट, पतंग महोत्सव, विद्यार्थी साहित्यिकांसाठी प्रतिभा संगम, आजी बाबा झालेल्या जेष्ठ मित्रांचा मेळावा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून अमळनेरकरांची सांस्कृतिक भूक पूर्ण करण्याचे कार्य त्यांनी केले असून यामुळेच बहुरंगी आणि सदाबहार व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.

 

Protected Content