खान्देश शिक्षण मंडळासाठी ६४.९१ टक्के मतदान

अमळनेर- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खान्देश शिक्षण मंडळाच्या कार्यकारिणीसाठी झालेल्या मतदानात ६४.९१ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला असून एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक विश्वस्त व आठ कार्यकारी मंडळ सदस्यांसाठी ही निवडणूक घेण्यात आली.

खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीकडे जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागून असल्याचे दिसून आले होते. या पार्श्‍वभूमिवर, रविवारी या संस्थेची निवडणूक प्रक्रिया पार पडली. एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, एक विश्वस्त व आठ कार्यकारी मंडळ सदस्यांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. यात ६४.९१ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत एकूण ५ हजार ७८६ मतदारांपैकी ३ हजार ७५६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवला.

यंदाच्या निवडणुकीत कार्यकारी संचालक पदासाठी आशीर्वाद आणि सहकार अशा दोन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. यात कार्यकारी संचालक पदासाठी आशीर्वाद पॅनलमधून नीरज अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, डॉ. संदेश गुजराथी, जितेंद्र जैन, योगेश मुंदडा, डॉ. अनिल शिंदे आणि निवृत्त न्यायाधीश गुलाबराव पाटील, हरी भिका वाणी हे तर सहकार पॅनलमधून माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, भरत कोठारी, हेमंत पवार, प्रभाकर कोठावदे, प्रसाद शर्मा, प्रवीण जैन, कल्याण पाटील हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर कमल कोचर हे अपक्ष रिंगणात आहेत. अध्यक्ष पदाच्या जागेसाठी तिरंगी लढत झाली, तर उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी आणि विश्वस्त पदाच्या एका जागेसाठीही तिरंगीच लढत झाली. तर कार्यकारी मंडळाच्या ८ जागांसाठी १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. अध्यक्षपदासाठी किसन पाटील, विक्रम शहा, जितेंद्र झाबक यांच्यात तिहेरी लढत होत आहे. उपाध्यक्ष पदासाठी जितेंद्र देशमुख, संदीप जैन, माधुरी पाटील यांच्यात लढत आहे. विश्वस्त पदासाठी वसुंधरा लांडगे, नगीनचंद्र लोढा, संतोष पाटील यांच्यात लढत होती. निवडणुकीचे कामकाज उपसमितीचे चेअरमन पंडित चौधरी, सदस्य डॉ. बी. आर. बाविस्कर, मनोहर महाजन, दिनेश नाईक पाहत आहेत. प्रताप महाविद्यालयात मतदान झाले.

दरम्यान, खान्देश शिक्षण मंडळासाठी मतदान झाले असले तरी धर्मदाय आयुक्तांनी आदेश दिल्यानंतरच याची मतमोजणी होणार आहे.

Protected Content