Home Cities अमळनेर अमळनेर ग्रामीण रुग्णालयाची आ. अनिल पाटलांकडून अचानक पाहणी !

अमळनेर ग्रामीण रुग्णालयाची आ. अनिल पाटलांकडून अचानक पाहणी !


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील ग्रामीण रुग्णालयातील असुविधा आणि संथ गतीने सुरू असलेल्या बांधकामाची गंभीर दखल घेत आ. अनिल पाटील यांनी रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणी दरम्यान रुग्णालयातील गैरसोयी, बंद असलेली स्वच्छतागृहे आणि अस्वच्छता पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, तसेच दोषींवर कडक कारवाईचा इशारा दिला.

सध्या अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याचे काम सुरू आहे. मात्र, वरील मजल्यावर सुरू असलेल्या बांधकामाची गती अत्यंत संथ असल्याचे आमदार पाटील यांच्या निदर्शनास आले. यावरून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना चांगलेच धारेवर धरले. “कोणत्याही परिस्थितीत पुढील दोन महिन्यांच्या आत उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाले पाहिजे,” असे कडक आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

अस्वच्छतेवरून डॉक्टरांना फटकारले :
गेल्या वर्षभरापासून रुग्णालयातील स्वच्छतागृहे बंद असल्याचे आणि दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असल्याचे पाहून आमदारांनी संताप व्यक्त केला. रुग्णांच्या कक्षातील बेडशीट्स अत्यंत अस्वच्छ होत्या. यावर बोलताना ते म्हणाले, “रुग्णालयात येणाऱ्या गरिबांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही.” त्यांनी तत्काळ स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून ती खुली करण्याचे आणि रुग्णालयात चोवीस तास स्वच्छता राखण्याचे निर्देश वैद्यकीय प्रशासनाला दिले.

उष्माघात कक्षाची विशेष पाहणी :
अमळनेर तालुक्यात सध्या उष्णतेची लाट असून उष्माघाताचे रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी रुग्णालयातील विशेष उष्माघात कक्षाची पाहणी केली. या कक्षात रुग्णांसाठी कुलर, थंड पिण्याचे पाणी, आवश्यक औषधांचा साठा आणि सर्व तातडीच्या सुविधा चोवीस तास उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणे हा त्यांचा हक्क असल्याचे त्यांनी बजावले.

या प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताळे यांच्याकडून आमदारांनी रुग्णालयाच्या एकूण कामकाजाचा आढावा घेतला. या दौऱ्यात आमदारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, विजय पाटील, जयेश पाटील उपस्थित होते. तर रुग्णालय प्रशासनातर्फे डॉ. जी. एम. पाटील, डॉ. संदीप जोशी, डॉ. प्रशांत शिंदे, डॉ. सुमित पाटील, डॉ. परेश पाटील आणि बांधकाम अभियंता भागवत माळी उपस्थित होते.


Protected Content

Play sound