अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाडळसरे धरण संघर्ष समितीने पुन्हा एकदा आंदोलनाचा नारा बुलंद केला असून तालुक्यात ठिकठिकाणी व्यंगचित्रांच्या माध्यमातून आश्वासने देणार्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.
गेल्या २३ वर्षापासून रखडलेले पाडळसे धरण निम्न तापी प्रकल्प गतिमानतेने पूर्ण व्हावा म्हणून पाडळसे धरण जन आंदोलन समितीने ५१ हजार पोस्ट कार्ड मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नावे लिहून टाकण्याचे आंदोलन ९ फेब्रुवारीला जाहीर केले आहे. यानिमित्त वेळोवेळी सर्वपक्षीय नेत्यांनी केलेल्या घोषणांवर व्यंग करणारे फलक ठिकठिकाणी लागले आहेत. धरणाच्या नावे केल्या वल्गना ….! आता तरी, निधी द्या ना…! असे शहरांमध्ये व तालुक्यात लावलेले भव्य होर्डिंग्ज जनतेचे लक्ष वेधून घेत चर्चेचा विषय ठरलेले आहेत!
१९९९ पासून पाडळसे धरणाचे भूमिपूजन झाल्यानंतर आजतागायत अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनी हे धरण पूर्ण करण्याबाबत वेगवेगळ्या घोषणा केलेल्या होत्या. निवडणुका आल्या म्हणजे घोषणा होतात आणि निवडणुका गेल्यात म्हणजे धरणाचे काम रखडते! असा अनुभव अमळनेरकरांना सातत्याने येत आहे. धरणाच्या प्रश्नांवर दोन दशकांपासून अधिक काळ आंदोलन करणार्या पाडळसरे धरण जनआंदोलन समितीने वेळोवेळी आंदोलन, निवेदन, मंत्रांच्या भेटी या माध्यमातून हा प्रश्न उचलून धरलेला आहे. समितीतर्फे जेव्हा जेव्हा आंदोलनाचा रेटा वाढतो त्या त्या वेळेस विविध पक्षाच्या व संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडून व राज्याच्या प्रमुखांकडून जनक्षोभ कमी करण्यासाठी घोषणा करण्यात आल्या आहेत. तात्पुरत्या, तकलादू, वेळकाढू घोषणांचा समाचार घेणारे भव्य व्यंगचित्रांचे होर्डिंग्ज समितीने ठिकठिकाणी लावलेले असून नागरिक मोठ्या संख्येने सदरील लक्षवेधी असे मार्मिक बॅनर वाचून खुमासदार चर्चा करीत आहेत.
अमळनेर येथे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने एप्रिल २०१९ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले असताना त्यांना पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्यावतीने काळे झेंडे दाखवण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी पाडळसे धरणासाठी आमच्या शासनाने २७७१ कोटींचे निधी उपलब्ध केला असून धरणाचे काम गतिमानतेने सुरू असल्याबाबतचे ट्विट केले होते. मात्र असा कोणताही निधी धरणास अजूनही प्राप्त झालेला नाही. म्हणून ना.देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट चा स्क्रीन शॉट होर्डिंग वर लावून व्यंग साकारण्यात आलेले आहे ते पुढील ओळीत-
धरणाच्या नावे ट्विट केले
२७७१ कोटींचे !
साहेब,कधी पाठवणार
पॅकेज धरणाच्या निधीचे!
यानंतर, अमळनेर येथे ना.अजितदादा पवार यांची सभा झाली असतांना ना. अजित पवार यांनी तुम्ही मला आमदार द्या! मी पाडळसे धरण पूर्ण करून देतो! असे आश्वासन जाहीरपणे दिले होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आमदार अमळनेरच्या जनतेने निवडून दिला आहे. आघाडी शासनाची दोन-तीन वर्ष सत्ता होती.मात्र धरणाचे काम अपेक्षेप्रमाणे पूर्ण झाले नाही. याबाबतचे विडंबन बोर्डावर करण्यात ठळकपणे लावलेले आहे.
दिला शब्द पाळतो
अशी दादांची कीर्ती !
आमदार दिला तरी
नाही केली वचन पूर्ती!
या प्रकारे टिका करण्यात आली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी पाडळसे धरणाची माती कपाळाला लावून सदर धरण पूर्ण करण्याबाबतचे प्रयत्न करण्याचे आश्वासन जाहीरपणे दिले होते. समितीला अजूनही खा.उन्मेष पाटील यांचे कडून मोठ्या अपेक्षाही आहेत.मात्र केंद्र सरकारकडून अजूनही या प्रकल्पास पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत समाविष्ट करून घेण्यात आलेले नसल्याने समितीने पुढील ओळी त्यांच्या व्यंगचित्रासमोर लिहिलेल्या आहेत….
खासदारकीसाठी कपाळी
लावली माती!
धरणासाठी केव्हा द्याल निधी
जनतेच्या हाती!
पाडळसे धरण जन आंदोलन समितीने ऐतिहासिक असा मूक मोर्चा हजारो नागरिकांच्या उपस्थित काढला होता त्यावेळी तत्कालीन जलसंपदा मंत्री ना गिरीश महाजन यांनी होऊन मोर्चाला संबोधित करून सदर प्रश्न बाबत तात्काळ कार्यवाही करण्याबाबत बैठक लावण्याची जाहीर केले होते व वेळोवेळी सदर धरण पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिले होते.मात्र ना.गिरिशभाऊ हे जळगाव जिल्ह्याचे नेते व राज्याचे जलसंपदा मंत्री राहूनही कोणताही निधी पाडळसे धरणास न मिळाल्याने समितीने रोष व्यक्त केला आहे तो पुढील वाक्यांमधून….
जलसंपदा मंत्री असतानाही
निधीच्या नावे बोंबाबोंब…
भाऊ, सांगा ना ! पाडळसेच्या निधीची कुणी अडवली गोम?
पाडळसरे धरण जन आंदोलन समितीच्या आंदोलनात आणि विविध कार्यक्रमात ना.गुलाबराव पाटील हे स्वतःला समितीचे कार्यकर्ते म्हणून वेळोवेळी उपस्थित राहिलेले आहेत व तसे तवेळोवेळी जाहीरही केलेले आहे. सध्याच्या सरकारमध्ये ना.गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्री ना एकनाथरावजी शिंदे यांचे जवळचे सहकारी, वजनदार मंत्री असल्याने समितीने बोर्डावर त्यांचे चित्र लावून त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या पुढील ओळींमधून……
जिल्ह्याच्या पालकत्वाचा टिळा
भाऊ आपल्या माथी!
तुम्ही तरी टाकणार का निधी
पाडळसेच्या खाती!
पाडळसे धरण जनआंदोलन समिती सातत्याने विविध सामाजिक संघटना,शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक चळवळी, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी तरुण, शिक्षित-उच्चशिक्षित संघटना, आणि अमळनेर तालुक्यातील सामाजिक भान असलेल्या पत्रकार संघटनांना सोबत घेऊन तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्प म्हणजे पाडळसरे धरण पूर्ण व्हावे यासाठीचे आंदोलन विविध मार्गांनी पुढे नेत आहे. या आंदोलनात सर्वसामान्य जनता ही उस्फूर्तपणे नेहमीच रस्त्यावर येत असते. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी मात्र अपेक्षित यश येत नव्हते. यावेळी विक्रमी ५१ हजार पोस्ट कार्ड मुख्यमंत्री ना.एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना अमळनेर तालुक्यातील जनतेकडून पाठवली जात आहे. या हजारो पत्रांची,त्यामागील जनभावनेची दखल यावेळी तरी राज्यकर्ते घेतील का याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.