जळगाव प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील कळमडू येथील एका ११ वर्षीय बालिकेसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या भिमराव नामदेव पाटील (वय ८१, रा. कळमडू ता.चाळीसगाव) या नराधमास सत्र न्यायालयाने आज पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व पाच हजाराचा दंड सुनावला आहे.
याबाबत सविस्तर असे की, १६ जून २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता पिडीत बालिका ही आरोपी भिमराव नामदेव पाटील, (वय-८१) याच्या चक्कीवर हरबऱ्याची डाळ दळायला गेली होती. यावेळी भीमराव पाटीलने बालीकेसोबत अश्लिल चाळे करुन तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पिडीत बालिकेच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात मेहूणबारे पोलिस स्टेशनला गुरनं ६८/२०१८ भादंवि कलम ३५४ व लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम ७, ८ व ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास पोउनि हेमंत शिंदे यांनी करत दोषारोपपत्र दाखल केले होते. सदरचा खटला जळगाव सत्र न्यायालयात न्या. आर. जे. कटारिया यांच्या समोर चालला. न्यायालयने सरकारपक्षातर्फे एकूण ०५ साक्षीदार तपासले. यात पिडीत अल्पवयीन मुलीची साक्ष ही खुप महत्वपूर्ण ठरली. याकामी सरकार पक्षातर्फे ॲड.चारुलता बोरसे यांनी साक्षीदारांच्या साक्ष नोंदवून प्रभावी युक्तिवाद करत सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निवाडयांचा आधार घेतला व आजोबा सदृश माणसाकडून नातीच्या वयाच्या लहानग्या मुलीसोबत केलेले कृत्य हे समाजात नात्यांच्या व माणुसकीच्या छबीला काळीमा फासणारे आहे, असा युक्तिवाद केला. पुरावे व प्रभावी युक्तिवादामुळे न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत साक्षीपुराव्या अंती कलम ३५४ व लैंगिक हिंसाचारापासून बालकांचे संरक्षण कायदा कलम ७, ८ व ९ खाली ०५ वर्षे सक्तमजुरी आणि रुपये ५ हजाराच दंड अशी शिक्षा सुनावली आहे. याकामी पैरवी अधिकारी सपोउनि शालीग्राम पाटील यांनी मदत केली. सदर खटल्यातील आरोपीतर्फे अॅड. जयंत मोरे व सोनवणे यांनी कामकाज पाहिले.