दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली असून, निकालाचे चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी केजरीवाल यांना पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या पराभवामुळे आम आदमी पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. दिल्लीच्या राजकारणातील ही घटना निर्णायक ठरू शकते. २०१३ पासून दिल्लीच्या राजकारणावर वर्चस्व गाजवणाऱ्या केजरीवालांचा पराभव हा पक्षासाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी धक्कादायक ठरला आहे. दुपारपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतीय जनता पक्ष ४६ जागांवर आघाडीवर आहे, तर आम आदमी पक्ष २४ जागांवर आघाडीवर आहे. निवडणुकीत भाजप आणि AAP यांच्यात तगडी चुरस होती, मात्र निकाल भाजपाच्या बाजूने झुकले आहेत.
आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनाही जंगपुरा मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला आहे. भाजपाचे तरविंदर सिंग मारवाह यांनी त्यांना पराभूत केले आहे. मारवा यांनी २०२२ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. याआधी ते काँग्रेसमध्ये होते आणि माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निकटवर्तीय मानले जात होते. या निवडणुकीच्या निकालामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठे परिवर्तन घडले आहे. आम आदमी पक्षासाठी ही निवडणूक आत्मपरीक्षणाची वेळ आहे, तर भाजपसाठी हा विजय आगामी राजकीय रणधुमाळीसाठी नवे बळ देणारा ठरते.