मुंबई (वृत्तसंस्था) युतीचे जागावाटप हे भारत-पाकिस्तान फाळणीपेक्षाही भयंकर असल्याचे वक्तव्य करत हा मुद्दा अत्यंत जटील बनल्याचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. दरम्यान, या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील जागावाटपाचा तिढा अधिक गुंतागुंतीचा बनल्यामुळेच युतीची घोषणा लांबत असल्याचे संकेत एका वृत्तसंस्थेशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत. यावेळी राऊत म्हणाले की, ‘इतका मोठा महाराष्ट्र आहे. या ज्या २८८ जागांचा वाटपाचा प्रश्न आहे हा भारत-पाकिस्तान फाळणीहून भयंकर आहे. आम्ही सरकारमध्ये सहभागी न होता जर विरोधी पक्षांच्या बाकांवर बसलो असतो, तर परिस्थिती वेगळीच असती. आम्ही जो काही निर्णय घेऊ तो तुम्हाला सांगूच,असे सूचक वक्तव्य केल्यामुळे राजकीय चर्चेला उधान आले आहे.