Home Cities यावल यावल एसटी आगारातील लोकार्पण सोहळ्यात नगराध्यक्षांचा प्रोटोकॉल डावलल्याचा आरोप ; अतुल पाटील...

यावल एसटी आगारातील लोकार्पण सोहळ्यात नगराध्यक्षांचा प्रोटोकॉल डावलल्याचा आरोप ; अतुल पाटील यांचा कार्यक्रमावर बहिष्कार

0
18


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल एसटी आगारात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाच नवीन अत्याधुनिक बसेसच्या लोकार्पण सोहळ्यात लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छायाताई अतुल पाटील यांच्या पदाचा आणि प्रोटोकॉलचा योग्य सन्मान करण्यात आला नसल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल वसंत पाटील यांनी केला आहे. या प्रकाराच्या निषेधार्थ त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकत तीव्र नाराजी व्यक्त केली.

कार्यक्रमासाठी नगराध्यक्ष सौ. छायाताई पाटील उपस्थित असतानाही त्यांना व्यासपीठावर अपेक्षित सन्मानाचे स्थान देण्यात आले नसून बाजूच्या खुर्चीवर बसावे लागल्याचा आरोप करण्यात आला. तसेच कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलनाच्या वेळी त्यांचे नाव उशिराने घेण्यात आले. सत्काराच्या वेळीही लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या पदाला अपेक्षित असलेला प्रोटोकॉल पाळण्यात आला नसल्याचे अतुल पाटील यांनी म्हटले आहे. नगरपरिषद यावलच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष या नात्याने सौ. छायाताई पाटील या कार्यक्रमातील प्रमुख लोकप्रतिनिधींपैकी एक होत्या. त्यामुळे त्यांना योग्य सन्मानाचे स्थान मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्यांच्याकडे करण्यात आलेल्या कथित दुर्लक्षामुळे उपस्थितांमध्येही नाराजीची भावना निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात कार्यक्रमाच्या नियोजन आणि सूत्रसंचालनाची जबाबदारी आगार प्रशासनाची असताना काही भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमात माईक हातात घेऊन सूत्रसंचालनात हस्तक्षेप केल्याचा आरोपही अतुल पाटील यांनी केला आहे. त्यामुळे शासकीय कार्यक्रमाचे स्वरूप बाजूला पडून कार्यक्रमात राजकीय हस्तक्षेप आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला.

या संपूर्ण प्रकारामुळे संतप्त झालेल्या अतुल पाटील यांनी आगार प्रशासन तसेच संबंधित भाजप पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकनियुक्त नगराध्यक्षांचा सन्मान आणि शासकीय कार्यक्रमातील प्रोटोकॉल पाळला जात नसेल, तर हा केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण यावल शहराचा अपमान असल्याची भूमिका त्यांनी मांडली. “शासकीय कार्यक्रम कोणत्याही एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसतो. अशा कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकनियुक्त लोकप्रतिनिधींना त्यांच्या पदानुसार योग्य सन्मान आणि प्रोटोकॉल मिळणे अपेक्षित आहे. यावल शहराच्या प्रथम नागरिक असलेल्या लोकनियुक्त नगराध्यक्षांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही,” असे अतुल पाटील यांनी स्पष्ट केले.

“राजकारण करायचे असेल तर ते निवडणुकीच्या मैदानात करा; मात्र शासकीय कार्यक्रमात लोकप्रतिनिधींचा प्रोटोकॉल आणि सन्मान पायदळी तुडवून राजकीय शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल वसंत पाटील यांनी व्यक्त केली. यावल आगारातील पाच नवीन बसेसच्या लोकार्पणाचा कार्यक्रम नागरिकांच्या सुविधेच्या दृष्टीने महत्त्वाचा असताना त्याला प्रोटोकॉल आणि राजकीय हस्तक्षेपाच्या आरोपामुळे वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकाराबाबत आगार प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.


Protected Content

Play sound