दिशा सालियान प्रकरणात सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील – चंद्रकांत पाटील

मुंबई, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील आणि दिशा सालियानच्या यांच्या मृत्यूबाबत सारं सत्य बाहेर येईल. यामध्ये कोण गुंतलंय आणि कोण तुरुंगात जाईल यावरील पदडा दूर सारला जाईल असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

एका पत्रकाराने दिशा सालियानच्या मृत्यूचे राजकारण होत असल्याचा आरोपासंदर्भात विचारले असता ते म्हणाले की, याबाबतीत काहीही राजकारण होत नाही. सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील, दूध का दूध – पानी का पानी होईल, कोण गुंतले आहे आणि कोणाला तुरुंगात जावे लागेल हे स्पष्ट होईल. सध्या त्यामुळेच उसने अवसान आणून शिवराळ भाषा वापरणे चालू आहे. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो तसा हा प्रकार आहे.

त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेले तर काही सुपात आहेत. कोठड्या तयार आहेत. उत्तर प्रदेशात सात मार्च रोजी शेवटचे मतदान झाले की, बहुधा कारवाई सुरू होईल. त्यातून पळता भुई थोडी होईल व त्यातून हे सरकार पडेल, असे आपले विश्लेषण आहे. असा अंदाज सामान्य माणूसही बांधू शकतो.

ते म्हणाले की, महाविकास आघाडी पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे. उसाचे एफआरपीचे पैसे दोन तुकड्यात देण्याचा या सरकारचा निर्णय ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान करणारा आहे. यामुळे शेतकरी ऊसशेती सोडून देतील असा धोका आहे. भारतीय जनता पार्टी या निर्णयाविरोधात टोकाचा संघर्ष करेल.

त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारने राजकारणासाठी सत्तेचा व पोलिसांचा दुरुपयोग चालविला आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा यासाठी त्यांना पकडून पोलीस ठाण्यात नेणे आणि दबाव आणण्याचा प्रकार चालू आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची १९७१ ची जमिनीची केस काढून पोलिसांनी त्यांचा प्रचंड छळ केला. अखेरीस त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. पोलिसांचा राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांप्रमाणे वापर करण्याचा हा प्रकार आम्ही सहन करणार नाही. आम्ही याच्याविरोधात लढा देऊ. जनताही अशा लोकांना धडा शिकवेल.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना नेते व मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलेल्या टीकेबाबत प्रतिक्रिया विचारली असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, २०१४ साली भारतीय जनता पार्टीने सरकार स्थापन केले. आम्ही हे सरकार आमच्या बळावर पाच वर्षे चालविले असते. पण शिवसेनेला सत्तेबाहेर राहणे अशक्य झाले काहीही करून सत्तेत घ्यावे यासाठी ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करत होते, हे आदित्य ठाकरे यांनी विसरू नये.

एसटीच्या संपाविषयी ते म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांना विविध शहरांमध्ये मोक्याच्या ठिकाणी असलेल्या एसटीच्या स्थानक व डेपोच्या जागा बळकावायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी संप चिघळवला आहे. सत्ताधारी आघाडीच्या सापळ्यात एसटी कर्मचारी अडकले आहेत.

Protected Content