‘महालक्ष्मी एक्सप्रेस’मध्ये अडकलेल्या 9 गर्भवतींसह सर्व 1050 प्रवाशांची सुखरुप सुटका

EAeUM01UIAEfpD8

 

मुंबई (वृत्तसंस्था) बदलापूर-वांगणी दरम्यान पुराच्या पाण्यात अडकलेल्या ‘महालक्ष्मी एक्स्प्रेस’मधील सर्व १०५० प्रवाशांची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. एनडीआरएफ, नौदल, हवाई दल, पोलीस यांच्याबरोबरच स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळे हे बचावकार्य अवघ्या तीन ते साडेतीन तासांत पार पडले.

 

वांगणी-बदलापूर रेल्वे मार्गावर महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली होती. या ट्रेनमध्ये जवळपास १०५० प्रवासी अडकले होते. आता सर्वांना सुखरुप ठिकाणी हलवण्यात आले आहे. नौदलाची ८ बचाव पथकं, ३ पाणबुड्यांचे पथके आणि एक सी किंग हेलिकॉप्टर बचावकार्यात लागले होते. या प्रवाशांध्ये 9 गरोदर महिलांचाही समावेश होता. दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या प्रवाशांसाठी जवळच 17 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेसद्वारे प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवले गेले आहे. प्रवाशांना मदत आणि उपयोगी साहित्य पुरवण्यात आले आहे.

 

सध्या या प्रवाशांना बदलापूर स्थानकावर पोहोचवले जात आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या बचाव कार्याबद्दल सांगितले की, 19 डबे असणारी विशेष ट्रेन महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना घेऊन कोल्हापूरला जाणार आहे. बचाव कार्य सुरु असताना प्रशासनाने घटनास्थळी 37 डॉक्टर्स पाठवले होते. या डॉक्टरांनी बचाव कार्यानंतर सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी केली. दरम्यान, आरपीएफ आणि नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अडकलेल्या प्रवाशांना बिस्किटं आणि पाणी दिले.

Protected Content