जळगाव पीपल्स बँकेत ‘अकोला मर्चंट’चे होणार विलीनीकरण !

जळगाव प्रतिनिधी | अकोला मर्चंट को-ऑप. बँकेचे जळगाव पीपल्स को-ऑपरेटीव्ह बँकेत विलीनीकरण करण्याच्या प्रस्तावाला बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे.

जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेची ८७वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी यशवंतराव मुक्तांगण सभागृहात झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन अनिकेत पाटील हे होते. सीइओ दिलीप देशमुख यांनी मागील सभेचे इतिवृत्त तसेच विषय सूचीचे वाचन केले. अध्यक्ष अनिकेत पाटील यांनी आर्थिक वर्षातील कामकाजाचा व आर्थिक परिस्थितीचा अहवाल सादर केला. यात मार्चअखेर बँकेच्या ठेवी १६०२ कोटी व कर्जे ८९९ कोटी असून, एकूण व्यवसाय २५०२ कोटी इतका आहे, अशी माहिती देण्यात आली.

दरम्यान, बँकेचे माजी चेअरमन तथा विद्यमान ज्येष्ठ संचालक भालचंद्र पाटील यांनी अकोला मर्चंट को-ऑप. बँक जळगाव पीपल्स बँकेत विलीनीकरण करण्याचा विषय मांडला असता याला सर्वानुमते मंजुरी मिळाली. सहकारी बँकांनी व्यवस्थापन मंडळ स्थापन करावे, असे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहेत. त्यानुसार बँकेने व्यवस्थापन मंडळ स्थापन केले असून, तज्ज्ञ म्हणून चार्टर्ड अकाउंटंट संजय पाटील, अभियंता भूषण चौधरी व निर्णय चौधरी यांची नेमणूक केलेली असल्याचेही सांगितले. ज्येष्ठ सभासद विश्वनाथ चौधरी व डॉ. पी. एस. पाखळे यांनी मनोगत व्यक्त केले.

या सभेस उपाध्यक्ष डॉ. प्रकाश कोठारी, संचालक डॉ.सी. बी. चौधरी, स्मिता पाटील, प्रा. विलास बोरोले, सुनील पाटील, रामेश्वर जाखेटे, चंदन अत्तरदे, राजेश परमार, प्रवीण खडके, ज्ञानेश्वर मोराणकर, तज्ज्ञ संचालक जे. एम. अग्रवाल, तरल शहा, व्यवस्थापन मंडळ सदस्य संजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. संचालक चंदन अत्तरदे यांनी सूत्रसंचालन केले.

Protected Content