भरधाव ट्रकने दुचाकीला उडविले; पती ठार, पत्नी गंभीर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या बांभोरी येथील जैन कंपनीसमोर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने पुढे जात असलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने पती ठार झाले तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी २७ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली आहे. जखमी महिलेस जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हेमंत काशिनाथ चौधरी (वय-५०) रा. खोटे नगर, जळगाव असे मृत प्रौढाचे नाव आहे.

जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात हेमंत चौधरी हे आपल्या पत्नी माधवी हेमंत चौधरी (वय-४५) यांच्यासह वास्तव्याला आहे. हेमंत चौधरी हे जळगाव शहरातील पोलनपेठ परिसरात मेडीकल डिस्ट्रीब्यूटर येथे नोकरीला होते. तर त्यांची पत्नी माधवी बांभोरी गावाजवळील जैन कंपनीत कामावर आहे. नेहमीप्रमाणे शनिवारी २७ मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पत्नीला कामावर सोडण्यासाठी हेमंत चौधरी हे दुचाकीने खोटेनगराकडून जैनकंपनीकडे दुचाकीने निघाले. जैनकंपनी जवळून जात असतांना बांभोरी गावानजीक एका भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत चौधरी दाम्पत्य हे दुचाकीसह रोडच्या खाली फेकले गेल्याने दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. रस्त्यावरील स्थानिक ग्रामस्थ व तरूणांच्या मदतीने जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपारार्थ दाखल करण्यात आले. यात हेमंत चौधरी यांचा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान दुपारी अडीच वाजता मृत्यू झाल्याची घोषणा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी  केली. या घटनेबाबत पोलीसात अद्यापपर्यंत कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठी गर्दी होती.

Protected Content