Home Cities अमळनेर अमळनेरमध्ये आखाजी महोत्सवाचा जल्लोष 

अमळनेरमध्ये आखाजी महोत्सवाचा जल्लोष 


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । खान्देशातील पारंपरिक आखाजी महोत्सवाने अमळनेरमध्ये यंदा मोठ्या उत्साहात रंगत आणली असून अहिराणी संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. पहिल्याच वर्षी प्रचंड गर्दी आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने हा महोत्सव भविष्यात अधिक मोठ्या प्रमाणावर आणि शासकीय पातळीवर साजरा करण्याचे संकेत मिळाले आहेत.

खान्देश साहित्य संघाच्या वतीने एलआयसी कॉलनी येथे आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी बोलताना सांगितले की, आखाजी हा अहिराणी संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा सण असून गौराई, झोक्यावरची गाणी आणि जात्यावरील गाणी या परंपरा जपणे गरजेचे आहे. पहिल्या महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद पाहता हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्यासाठी सांस्कृतिक मंत्री आणि शासनाकडे निधीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अमळनेरपासून दूर राहूनही अहिराणी भाषेची गोडी कमी झाली नसल्याचे सांगत त्यांनी भाषण अहिराणीतूनच केले आणि महिलांनी आधुनिकतेसोबत परंपरा टिकवून ठेवाव्यात, असे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी होते. यावेळी आमदार अनिल पाटील यांनी महिलांनी अजूनही रूढी आणि परंपरा जतन करून ठेवल्या असल्याचे कौतुक केले, तर माजी आमदार साहेबराव पाटील यांनी अहिराणी शैलीत भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष शरद धनगर यांनी केले तर स्वागताध्यक्ष अशोक आधार पाटील यांनी स्वागतपर भाषण केले. प्रमुख पाहुण्यांमध्ये रमेश बोरसे, प्राचार्या रत्नाताई पाटील, ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील, कवी हिरामण कंखरे, गोकुळ बागुल, शाहीर नाना पाटील, भाऊसाहेब देशमुख, जयवंतराव पाटील, डॉ. अनिल शिंदे, दिनेश नाईक आणि एल. टी. पाटील यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.

या महोत्सवात पारंपरिक स्पर्धांचे विशेष आकर्षण होते. पुरणपोळी, झोक्यावरची गाणी, उखाणे-वेशभूषा, आरास, घटयावरील गाणी आणि चित्रकला अशा विविध स्पर्धांमध्ये महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. पुरणपोळी स्पर्धेत प्रतिभा चौधरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर झोक्यावरच्या गाण्यांच्या स्पर्धेत मेघना पवार आणि दीपिका पाटील यांची जोडी विजेती ठरली. उखाणे-वेशभूषा स्पर्धेत विजयाताई पाटील यांनी बाजी मारली, तर आरास स्पर्धेत जिजाऊ ग्रुपने प्रथम स्थान मिळवले. घटयावरील गाण्यांमध्ये रंजना महाजन यांनी तर चित्रकलेत आशा दुसाने आणि लता दुसाने यांनी यश संपादन केले.

कार्यक्रमासाठी विविध मान्यवर आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले. नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थांच्या प्रतिनिधींनी बक्षिसे व आयोजनासाठी योगदान दिले. परीक्षक म्हणून वसुंधरा लांडगे, प्रा. शीला पाटील, लीना पाटील आणि इतर मान्यवरांनी काम पाहिले. सूत्रसंचालन संजय पाटील आणि पूनम बेडसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन उमेश काटे यांनी मानले.

महोत्सव यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते, महिला गट आणि विविध संस्थांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. एलआयसी कॉलनीसह माऊली जल आणि अंबिका फोटो यांचाही सहभाग महत्त्वाचा ठरला.


Protected Content

Play sound