Home क्राईम ब्रेकींग न्यूज : गावठी पिस्तूलातून गोळी झाडून तरूणाने संपविली जीवनयात्रा !

ब्रेकींग न्यूज : गावठी पिस्तूलातून गोळी झाडून तरूणाने संपविली जीवनयात्रा !


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. खुशाल आप्पा नगरातील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय तरुणाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. स्वप्निल प्रवीण शिंपी असे मयत तरुणाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल सकाळी आपल्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रांसोबत नेहमीप्रमाणे वावरत होता. मात्र, दुपारच्या सुमारास त्याला एक फोन आला. हा फोन आल्यानंतर स्वप्निल अचानक अस्वस्थ झाला. कोणालाही काहीही न सांगता तो आपल्या खोलीत गेला आणि त्याने आतील बाजूने दरवाजा बंद करून घेतला. काही क्षणांतच खोलीतून गोळीबाराचा मोठा आवाज आला.

आवाज ऐकताच घाबरलेल्या नातेवाईकांनी धाव घेत खिडकीतून आत पाहिले असता, स्वप्निल रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. कुटुंबीयांनी तातडीने दरवाजा तोडून त्याला बाहेर काढले आणि उपचारासाठी भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून गावठी पिस्तूल आणि स्वप्निलचा मोबाईल फोन जप्त केला आहे. स्वप्निलला नक्की कोणाचा फोन आला होता आणि तो इतका अस्वस्थ का झाला, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. सध्या पोलिसांनी मोबाईलचे लॉक उघडण्याचे काम सुरू केले असून, त्यातूनच या आत्महत्येचे नेमके गूढ उकलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेचा पुढील तपास भडगाव पोलीस करत आहेत.


Protected Content

Play sound