अकबर लोन याचे पाकिस्तान प्रेम पुन्हा उफाळले

 

download 9

 

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचाराला वेग आलेला आहे. राजकीय नेत्यांची वादग्रस्त विधानेही सुरु झाली आहेत. जम्मू काश्मीरचे नॅशनल कॉन्फरन्स पार्टीचे नेते मोहम्मद अकबर लोन याचे पाकिस्तान प्रेम उफाळून आले असून त्याने एक वादग्रस्त विधान केले आहे.

कुपवाडा येथे सभेत बोलताना अकबर लोन याने म्हटले की, जर पाकिस्तानला कोणी एक शिवी दिली तर त्याला मी येथून १० शिव्या देईन. एवढेच नाही तर पाकिस्तान यशस्वी व्हावा, आमची आणि त्यांची दोस्ती वाढावी. पाकिस्तान नेहमी खुश रहावा आणि त्याने प्रगती करावी, अशी वादग्रस्त विधानेही लोन याने यावेळी केली.
अकबर लोन याने केलेल्या या वक्तव्यावर सोशल मिडीयात नेटीझन्सकडून संताप व्यक्त करण्यात आला. लोन याने माजी मुख्यमंत्री उमर अब्दुला यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले होते. लोन याने पाकिस्तानबद्दलचे प्रेम पहिल्यांदा व्यक्त केलंय असं नाही तर याआधीही लोन यांनी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या आहेत. जम्मू काश्मीर विधानसभा सभागृहाचे कामकाज सुरू असताना भाजपाचे काही आमदार सभागृहात पाकिस्तान विरोधी घोषणा देत होते, त्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी अकबर लोन यांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या त्यावेळीही असाच वाद उफाळून आला होता.
यावेळी जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस पार्टीची आघाडी झाली आहे. काँग्रेस जम्मू आणि उधमपूर या जागेवरुन निवडणूक लढवणार आहे. तर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुला श्रीनगरवरुन निवडणूक लढवणार आहेत. अनंतनाग, बारामुला आणि लडाख याठिकाणी काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. जम्मू काश्मीरच्या सहा जागांपैकी पाच जागांवर लोकसभेच्या पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.

Add Comment

Protected Content