जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर येथील वसुनंदिनी फाऊंडेशनतर्फे कवी-गझलकार ॲड. मुकुंदराव जाधव यांच्या “मनाच्या नजरेतून..” या काव्यसंग्रहाला “वसुनंदिनी राष्ट्रीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार” प्रदान करण्यात आला. तसेच त्यांनी केलेले साहित्य लेखन आणि त्यासाठी घेतलेले अथक परिश्रम याची दखल घेऊन वसुनंदिनी फाऊंडेशनचा राज्यस्तरीय साहित्य रत्न सन्मान पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.
राज्यभरातून कवी-लेखक यांना स्वलिखित कथा, कादंबरी, कविता-संग्रह प्रकाशित झालेले साहित्य निवड करण्यासाठी मागविण्यात आले होते. निवड झालेल्या साहित्यिकांना पुरस्कार देण्याचे पूर्व सूचित केले होते. जळगांव येथिल कवी- ॲड. मुकुंदराव जाधव यांच्या “मनाच्या नजरेतून…” काव्यसंग्रहाची वसुनंदिनी राष्ट्रीय उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. जळगांव येथे झालेल्या कवीसंमेलनात उद्घाटक स्वाती आफळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष डाॅ. मीना श्रीवास्तव, प्रमुख उपस्थिती प्रमोद कुलकर्णी, प्रमुख पाहुण्या सुलक्ष्मी बाळगीं, डाॅ. विद्या डागा, वसुनंदिनी फाऊंडेशनचे अध्यक्ष विद्याधर सोनवणे, सचिव माधुरी कुलकर्णी या मान्यवरांचे हस्ते ॲड. मुकुंदराव जाधव यांना वरील दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात आलेत.
सन २००० पासून ॲड. मुकुंदराव जाधव जळगांव जिल्हा व सत्र न्यायालयात वकीली पेशाचे कामकाज करीत आहेत. “मनाच्या नजरेतून…” हा पहिला काव्यसंग्रह आहे. नुकताच त्यांचा “फुलला सुगंध प्रेमाचा…” हा दुसरा काव्यसंग्रह (प्रेम कवितांचा समावेश असलेला) प्रकाशित झालेला आहे. यापुर्वी त्यांना मराठी साहित्य मंडळ, ठाणे यांचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच गझल मंथन साहित्य संस्थेतर्फे गझलयात्री -२०२३ हा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल जळगांव जिल्हा वकील मित्रपरिवारातर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आलेले आहे.