जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील महाबळ येथील सैनिक कार्यालयासमोर अज्ञात कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाला असून पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी झालेल्या प्रौढाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याबाबत बुधवारी ३० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामानंद नगर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अशोक काशिनाथ सातपुते (वय-४५) रा. गोपाळपुरा, विठ्ठलपेठ, जळगाव हे प्रौढ व्यक्ती आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. रविवारी २० ऑगस्ट रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास अशोक सातपुते हे त्यांची दुचाकीने महाबळ परिसरात जात होते. त्यावेळी सैनिक कार्यालयासमोर एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाला. त्यानंतर त्यांना शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर बुधवारी ३० ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता अशोक सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीसात अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र तावडे करीत आहे.