शेरा चौकातील हॉटेलमध्ये गॅस गळतीने सिलेंडरने घेतला पेट; सुदैवाने अनर्थ टळला

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मेहरूण येथे शेरा चौकात हॉटेलमध्ये गॅस सिलेंडरच्या टाकीला गळती झाल्याने टाकीला अचानक आग लागली. आगीत हॉटेलच्या किचनमधील साहित्य जळून खाक झाले परंतू अग्निशमन दलाच्या जावानांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला आहे.

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मेहरूण येथील शेरा चौकात लझीझ हॉटेल आहे. या हॉटेलच्या किचनमधून बुधवारी १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास धूर निघू लागला. यानंतर परिसरातील नागरिकांनी याबाबत अग्निशमन विभागाला कळविले. त्यानुसार अग्निशमन दलाचे जवान बंबासह लागलीच दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळेचा अपव्यय होऊ नये, अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळाकडे रवाना झालेत. अग्निशमन दलाचे पथक जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना हॉटेलच्या किचनमध्ये सिलेंडर पेटलेल्या अवस्थेत दिसून आला. सिलेंडरची आग विझविण्यासाठी नागरिकांनी त्यावर गोणपाट टाकलेले होते. मात्र, ते गोणपाट देखील जळून खाक झाला आहे. पेटत्या सिलेंडरवर पाणी टाकून विझविण्याचा प्रयत्न केला असता त्याने अधिक पेटला घेतला. ही बाब लक्षात घेऊन पाण्याचा मारा थांबिण्यात आला. यांनतर अग्निशमन गाडीतून फायर इन्स्टीग्युशर आणण्यात आले. किचनमध्ये आगीचे लोळ उठत होते. पाच मिनिटे जरी उशीर झाला असता तर अनर्थ घडला असता. हि आग विझविण्यासाठी किचनच्या मागील दरवाजाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो दरवाजा आतून बंद असल्याने उघडू शकला नाही. यांनतर शर्तीचे प्रयत्न करून पेटलेले सिलेंडर हॉटेलच्या बाहेर काढण्यात आले. पाणी व फायर इन्स्टीग्युशरच्या मदतीने सिलेंडरची आग विझविण्यात आली. या आगीत हॉटेलच्या किचनमधील फ्रीज, किचनमधील साहित्य जळून खाक झाले. ही आग अग्निशमन दलाच्या या प्रकाश चव्हाण, भिला कोळी, पन्नालाल सोनवणे, राजमल पाटील,नितीन बारी कर्मचाऱ्यांच्या शर्तीच्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आली. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Protected Content