गारखेड्याच्या इसमाने उचलले टोकाचे पाऊल : मृतदेहासह आप्त पोलीस स्थानकात !

जामनेर Jamner -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कौटुंबिक वादात अनेकदा तक्रारी करून देखील कार्यवाही न केल्यामुळे एका इसमाने जीवनयात्रा संपविल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, काल रात्री जामनेर पोलीस स्थानकाच्या ( Jamner Police Station ) समोर मोठा गोंधळ उडाला होता. तालुक्यातील गारखेडा येथील शांताराम गणपत चौधरी यांच्या कुटुंबात संपत्तीवरून वाद सुरू होते. यात त्यांचा होमगार्ड असलेला मुलगा हा कुटुंबियांना दमदाटी करून धमकावत असतांना देखील पोलीस कार्यवाही करत नसल्यामुळे शांताराम चौधरी, त्यांचा एक मुलगा, सून आणि त्यांची पत्नी यांनी जामनेर पोलीस स्थानकाच्या समोर ठिय्या मांडला होता.

शांताराम चौधरी यांचा मुलगा हा होमगार्ड असल्याने पोलीस त्यांची पाठराखण करत असल्याचा आरोप त्यांच्यासह कुटुंबियांनी केला होता. पोलिसांनी दखल न घेतल्यास आपण जीवाचे काही तरी बरे-वाईट करून घेऊ अशी धमकी शांताराम चौधरी देत होते. यावरून काल रात्री पोलिसांनी त्यांची तक्रार लिहून घेतली.

दरम्यान, शांताराम गणपत चौधरी यांनी शेतात जाऊन काल रात्री विषारी द्रव्य प्राशन केले. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, उपचार सुरू असतांना आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे संतप्त झालेल्या चौधरी कुटुंबियांसह आप्तांनी त्यांचा मृतदेह जामनेर पोलीस स्थानकात आणला. याप्रसंगी पोलीस निरिक्षकांनी सदर प्रकरणात कार्यवाही करण्यात येईल असे आश्‍वासन दिल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात नेमकी काय कार्यवाही होणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content