जिल्ह्यात लम्पी नियंत्रणात; आतापर्यंत ५ लाख ५९ जनावरांचे लसीकरण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल , पारोळा, अमळनेर व धरणगाव या सात तालुक्यांतील ७८ ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी आजाराने पुन्हा डोके वर काढले होते मात्र जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पशुसंवर्धन विभागाचा वेळोवेळी घेतलेला आढावा व उपयोजनेमुळे जिल्ह्यात आता लम्पी नियंत्रणात आला आहे. जिल्ह्यात  ५ लाख ५९ हजार ११० जनावरांचे लसीकरण झाले असून लसीकरणाने गती घेतली आहे. नव्याने लम्पी लागण झालेल्या जनावरांची संख्या मागील अनेक दिवसांपासून स्थिर आहे.

 

जिल्ह्यातील या सात तालुक्यांतील सर्व जनावरांचे आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी दिले मागील आठवड्यात दिले होते.‌ लम्पी प्रादुर्भावग्रस्त गावांपासून पाच किलोमीटर परिसरातील जनावरांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार, जत्रा व प्रदर्शने आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. बाधित क्षेत्राच्या भोवताल परिघातील सर्व गावांतील फक्त गोवर्गीय जनावरांना गोट पॅाक्स लसीची मात्रा देण्याची सूचनाही करण्यात आली आहे. रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये व रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामधून पशुधनाची होणारी खरेदी-विक्री व प्रत्यक्ष वाहतूक प्रतिबंधीत करण्यात‌ आली आहे.

 

याचबरोबर चाळीसगाव सारख्या जास्त प्रादुर्भाव असलेल्या तालुक्यात ४ तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्या सेवा वर्ग करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९७ टक्के लसीकरण झाले आहे. दररोज दिलेल्या उद्दिष्टाच्या शंभर टक्के लसीकरण करण्यात येत आहे. दररोजची लम्पी लागण संख्या ५०० ते  ५३५ या दरम्यान मागील अनेक दिवसांपासून स्थिर आहे. जेवढ्या प्रमाणात नवीन केसेस रोज आहेत. तेवढेच जनावरे रोज बरे होत आहेत. प्रकृती अस्थिर असलेल्या जनावरांची तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून नियमित तपासणी करून घेण्यात येऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.श्यामकांत पाटील यांनी दिली आहे.

 

जिल्ह्यातील लम्पी स्थितीवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे. दररोज लसीकरण व सुविधेचा आढावा घेत आहे‌. शंभर टक्के लम्पी मुक्त जिल्हा करणे हे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.‌

Protected Content