मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या टिकेला युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांमध्ये एकमेकांवर टिका करण्याची जणू काही स्पर्धाच सुरू झाली आहे. यावल तालुक्यातील न्हावी येथील कार्यक्रमात बोलतांना राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत ते गोधडीत होते तेव्हापासून आपण शिवसेनेत असल्याचे म्हटले होते. यानंतर त्यांनी नवीन दालनातून कामास प्रारंभ करतांनाही आदित्यंना इशारा देत टीका थांबविण्याचा इशारा दिला होता.
यावर आज आदित्य ठाकरे यांनी लोकमत न्यूज १८ या वाहिनीशी बोलतांना जोरदार पलटवार केला आहे. ते म्हणाले की, शिंदे गटाचे मंत्री आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आता बोलण्यासारखं काही राहिलं नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात गोधडी शब्दाचा वापर केला होता. तेच हे कॉपी करत आहे. एकच प्रश्न आहे, ३२ वर्षांच्या तरुणाने प्रश्न विचारायचे नाही का, माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला, शिवसेना का फोडली हे विचारायचं नाही का, चांगला माणूस मुख्यमंत्री झाला होता, त्याला पायउतार का करायला लावले हे आम्ही विचारायचं नाही का, ५० खोक्याचे काय झाले हे विचारू नये का, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांना विचारला.
दरम्यान, आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाच्या अन्य नेत्यांवरही टीका केली. ते म्हणाले की, तानाजी सावंत हे हाफकिन दलाल आहे असे म्हणतात,त्यांना माहीतच नाही हाफकिन कोण आहे आणि आता हे असे लोक एकत्र येत आहे. मनसे,भाजप, शिंदे गट कुणीही एकत्र येऊ दे जिंकणार शिवसेनेचा आहे, असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी नमूद केले.