रायगड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील पालकमंत्र्यांची यादी काल जाहीर झाली. त्यानंतर या निर्णयाचे कुठे चांगले तर कुठे वाईट पडसाद उमटले. रायगडचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष असतानाच या यादीत रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना डच्चू मिळाल्याने गोगावले समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. हे कार्यकर्ते एवढ्यावरच न थांबता या कार्यकर्त्यांनी रात्रीपासून महाड जवळील मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून या निर्णयाचा निषेध केला. आज सकाळी दक्षिण रायगड जिल्ह्यातील एकूण ३२ गोगावले समर्थक आणि पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे तडकाफडकी राजीनामे देखील दिलेत. यामुळे आता माहितीयुतीतील पालकमंत्री पदाचा वाद चिघळण्याची दाट शक्यता आहे.

दुसरीकडे सुनील तटकरे यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाबाबत शिर्डीमध्ये मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावरून सुनील तटकरे हे पालकमंत्री पदासाठी आदिती तटकरे यांची वर्णी लावण्यासाठी ठाम असल्याच पहायला मिळाले. मात्र रायगडमधील संतप्त शिवसैनिकांचा राग शांत करण्यासाठी आणि दिलेले राजीनामे मागे घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेतील हे पाहणे औत्सुक्याचे राहील.
राज्यातील पालकमंत्री पदाची यादी काल जाहीर झाली. यानंतर भरत गोगावले आणि त्यांचे समर्थक प्रचंड नाराज आहेत. आज भरत गोगावले यांनी त्यांच्या रायगड मधील शिवनेरी निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याच आवाहन केलं.तर प्रशासनाला कोणत्याही स्वरूपात गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले. मात्र कार्यकत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यात शिवसेनेत खळबळ उडाली आहे.