मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नवरात्रोत्सवास आज दि.२६ सप्टेंबर सोमवारपासून प्रारंभ झाला आहे. तसेच मुक्ताई साहेबांचा जन्मदिन सुद्धा अश्विन शु.प्रतिपदा (घटस्थापना) याच दिनी असल्याने नवरात्रीच्या पहिल्या माळेचे आई साहेबांचा ७४३ वा जन्मसोहळा विविध धार्मिक कार्यक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.
मुक्ताई साहेबांचा जन्मदिनाचे औचित्य साधून तापी पूर्णा परिसर श्री स्वामी समर्थ सेवेकरी परिवारातर्फे हजारोंच्या संख्येत उपस्थित राहून सकाळी १०:३० ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान मोठ्या उत्साहात श्री दुर्गा सप्तशती पारायण , संत मुक्ताई विजय ग्रंथ पारायण सोहळा पार पाडून आई साहेबांच्या जन्मोत्सव अध्याय दरम्यान पुष्पवृष्टी व नाम गजर करून आई साहेब मुक्ताई यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
पारायण सोहळ्याने आले मुक्ताई मंदिर परिसरात नवचैतन्य : आई साहेब मुक्ताई यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील हजारो महिला घरच्या घटस्थापना , व भगवती च्या आगमनाच्या कामांची लगभग असताना देखील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे मार्गदर्शक परम पूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवकरी परिवारातर्फे केलेल्या एका आवाहनात हजर झाल्या होत्या. मोठ्या उत्साहात येथे पारायण सोहळा पार पडला. संत मुक्ताई च्या जन्मोत्सव अध्यायात पुष्प वृष्टी करताना भाविकांचे आनंदाश्रू आणि आई साहेब मुक्ताई यांचा प्रफुल्लित चेहरा तसेच भक्तिमय वातावरण नवचैतन्याचे आनंदाचे झरे वाहताना येथे दिसत होते. यावेळी संत मुक्ताई संस्थान चे अध्यक्ष ॲड रविंद्र पाटील यांनी संत मुक्ताई मंदिर परिसर सेवेसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल सेवेकरी व भाविकांतर्फे अध्यक्ष व विश्वस्त मंडळाचे आभार मानण्यात आले.
आदिशक्ति च मुक्ताई येथे असल्याने या ठिकाणी दररोज पारायण सेवा करण्याचे आवाहन : संत परंपरेतील मोठा अधिकार असलेल्या आदिशक्ती मुक्ताई या संपूर्ण मुक्ताई नगर च्या अधिष्ठान असल्याने त्याच्यातच साडेतीन शक्ती पिठाचे देवत्व असल्याने सेवेकरी व भाविकांनी नवत्रोत्सव पर्वात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून दररोज दुपारी १ ते ३ या वेळेत श्री दुर्गा सप्तशती पारायण सेवा करण्याचे आवाहन सेवा मार्गाचे श्री पुरुषोत्तम वंजारी, मुक्ताई मंदीराचे व्यवस्थापक ह.भ. प. उद्धव जूनारे महाराज व ह.भ.प दुर्गा संतोष मराठे(किर्तनकार) यांनी केले.
मुक्ताई साहेबांच्या जन्मोत्सवाचे छोटेसे बॅनर ही लावण्यास लोक प्रतिनिधी, समाज सेवी संस्था यांनी तसदी घेतली नाही. एरव्ही वाढदिवस असतील किंवा राजकीय घडामोडी यावर बॅनर बाजी होताना दिसून येथे परंतु मुक्ताईनगर तालुक्याचे वैभव असलेल्या आदिशक्ती मुक्ताई यांच्या जन्मोत्सवाचे छोटेसे बॅनर देखील कोणाकडून लावण्यात आले नाही. त्यामुळे मुक्ताईनगर कर यांनी उदासीनता आपल्या भूषण असलेल्या मुक्ताई प्रती येथे दिसून आली.