मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | डेटा सादरीकरणात राज्य सरकारची दिरंगाई आणि राज्याचे अॅडव्होकेट जनरल यांच्या चुकामुळेच ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, असा आरोप करत निवडणुका ओबीसी आरक्षणानुसारच व्हाव्यात, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
मध्य प्रदेशातील शिवराजसिंह चौहान सरकारचा अहवाल ग्राह्य मानत ओबीसी आरक्षणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मान्यता दिलेली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने राज्यात ओबीसी राजकारण चांगलेच तापले आहे.
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल यांच्या अनेक गंभीर चुका आहेत. अनेकवेळा यासंदर्भात सूचना केल्या आहेत. अॅडव्होकेट जनरल बदलवण्याचे अधिकार मुख्यमंत्री आणि कॅबिनेटला असतात. तो निर्णय घ्यायचा की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. तेच अॅडव्होकेट जनरल हवे असतील तर त्याला आमचा विरोध नाही. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका ओबीसी आरक्षणासह व्हाव्यात अशी मागणी काँग्रेस ओबीसी सेलची व ओबीसी संघटनांची आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्याबाबत निवेदन देण्यात आले आहे असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.
सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा
संभाजीराजेंबद्दल आदर असून महाविकास आघाडीच्या कोट्याचा जो निर्णय झाला आहे. गेल्यावेळी राष्ट्रवादीला अधिकार होता, आता शिवसेनेचा अधिकार आहे. त्यानुसार शिवसेनेने दिलेले आमंत्रण हा त्यांचा विषय आहे. या विषयावर काही बोलण्याचा प्रश्नच नाही. शिवसेनेतर्फे जो उमेदवार असेल त्याला काँग्रेस पाठिंबा देईल. शिवसेनेने कोणाला उमेदवारी द्यावी, हा त्यांचा अधिकार असला तरी महाविकास आघाडीत सर्वांना विश्वासात घेऊन त्यांनी हा निर्णय घ्यावा, त्याला आमचा पाठिंबा असेल, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचेही पटोले यांनी म्हटले आहे.