ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वृध्दापकाळाने निधन

viju khote d

मुंबई वृत्तसंस्था । ‘शोले’ या सुप्रसिद्ध चित्रपटातील ‘कालिया’च्या भूमिकेद्वारे रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे वृद्धापकाळाने मुंबई येथील राहत्या घरी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. तब्येत खालावल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल केले होते. विजू खोटे यांच्या पार्थिवावर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विजू खोटे यांनी ३०० हून अधिक मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून अभिनय केला आहे. त्यांनी असंख्य छोट्या भूमिका केल्या असल्या तरी त्यांचे अभिनय कौशल्य आणि संवादफेक अप्रतिम असल्याने त्या दर्शकांच्या कायम लक्षात राहिल्या. शोले चित्रपटातील त्यांची कालियाची भूमिका विशेष गाजली. शोलेतील गब्बर जेव्हा तेरा क्या होगा, कालिया?, असे विचारतो तेव्हा कालिया घाबरत उत्तर देतो, ‘ स..स.. सरदार, मैने तो आपका नमक खाया हैं, सरदार’ हा संवाद अत्यंत गाजला. चार दशकांचा काळ उलटून गेला असला तरी आजही या संवादाचे स्मरण केले जाते. विजू खोटे यांनी नायकाच्या भूमिकेपासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली असली, तरी देखील पुढे त्यांनी छोट्या परंतु स्मरणात राहतील अशा भूमिका साकारल्या.

Protected Content