धरणाच्या मागणीसाठी ‘तो’ चढला झाडावर !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | निम्न तापी पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे या मागणीसाठी बुधगाव येथिल पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचा युवा कार्यकर्ता उर्वेश साळुंखे यांनी चक्क झाडावर चढून आंदोलन केले.

निम्न तापी पाडळसरे धरण जलदगतीने पूर्ण व्हावे या मागणीसाठी रक्ताने लिहिलेले पत्र मुख्यमंत्री यांना पाठवून आंदोलनाचा इशारा उर्वेश साळुंखे यांनी दिला होता. यानंतर शुक्रवारी त्यांनी अनोखे आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मुख्यमंत्री यांनी याबाबत लक्ष घालावे व सदर प्रश्नावर वेळ द्यावी याकरिता झाडावर बसून लाक्षणिक आंदोलन केले.

उर्वेश साळुंखे यांनी सकाळी ग्राम दैवताचे दर्शन घेवून आंदोलन स्थळी मार्गक्रमण केले.यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. यानंतर ते झाडावर जाऊन बसले. आंदोलन सुरू होताच माजी विधानसभा अध्यक्ष अरूणभाई गुजराथी यांनी आंदोलन स्थळी भेट देवून ग्रामस्थांशी चर्चा केली. आंदोलक साळुंखे यास झाडावरून खाली उतरण्याची विनंती केली तसेच माजी जि. प.सदस्य सुनिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेशी दूरध्वनीवरून संपर्क साधला.

ना.अजित पवार यांनी लवकरच मंत्रालय येथे सदर प्रश्नावर भेट देण्याचे आश्वासनं दिले. तर डॉ. चंद्रकात बारेला, अतुल ठाकरे, तालुकाध्यक्ष शशीकांत पाटील यांचेसह गावातील नागरिकांनी केलेल्या विनंतीस मान देऊन दुपारी झाडावरून खाली उतरवले गेले.

याप्रसंगी या धाडसी व अनोख्या आंदोलनाला पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी, हिरामण कंखरे, रणजित शिंदे, सुनिल पाटील, देविदास देसले आदींनी अमळनेर येथून येवून आंदोलनकर्त्याची भेट घेत आंदोलनास पाठींबा दिला. तर स्थानिक शेतकरी संघटना , ग्रामसत्ता एकजूट, एक मूठ , अजिंक्य क्रांती फाउंडेशन यांचेसह बुधगाव, अनवर्दे, मालखेडा, वाळकी, आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळी यांनीही भेट देवून पाठिंबा दर्शविला.

यावेळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंडळ अधिकारी रविंद्र माळी, तलाठी गजानन पाटील, कोतवाल चंद्रकांत साळुंखे, पोलीस खात्याचे प्रमोद पारधी , संजय निळे, पोलिस पाटील बापु धनगर उपस्थित होते.

Protected Content