गांधी रिसर्च फाऊडेशनद्वारा आचार्य श्रीवत्स गोस्वामी यांचे व्याख्यान संपन्न

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय संस्कृती ही सौंदर्य रसोपासक आहे. त्या उपासनेचे मूळ सूत्र सेवा हेच आहे. भारताची जी आध्यात्मिक साधना आहे त्याच सेवेला आपण संस्कृत मध्ये भक्ती असे म्हणतो. तेच सेवातत्व महात्मा गांधीजींनी आपल्या जीवनात अवलंबले. सेवा परमोधर्म यातच सार्थकता मानले. हेच भगवत गीतेचे सार आहे.

समाजसेवा आणि सिद्धांतनिष्ठ कर्मयोगाची प्रेरणा भगवान श्रीकृष्ण यांनी भगवत गीतेतून दिली. याच भगवत गीतेला आपल्या कृतीतून आचरणात आणणारे महात्मा गांधी, श्रीकृष्णाने सांगितलेल्या कर्मयोगातून गांधीजींचे तत्त्वज्ञान, यावर गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा ‘मोहन लीला’ कार्यक्रमाचे आयोजन गांधी तीर्थ कस्तूरबा सभागृह केले होते. यामध्ये वृंदावनच्या राधारमण मंदिराचे उपासक आचार्य श्रीवत्स गोस्वामी यांनी मार्गदर्शन केले. ‘मनमोहन’ ते ‘मोहनदास’ पर्यंतचा प्रवास त्यांनी सहज सोप्या भाषेत उलगडून दाखविला. यावेळी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, फाऊंडेशनच्या रिसर्च डीन गीता धरमपाल उपस्थित होते. श्रीवत्स गोस्वामी यांचे स्वागत सूतीहार, महात्मा गांधीजींचा पुतळा, शाल देऊन अशोक जैन यांनी केले.

श्रीवत्स गोस्वामी पुढे म्हणाले की, हिंदूचे तीर्थ हे जलाधिष्ठीत आहेत तर जैनांचे तीर्थ पर्वताधिष्ठीत आहे. गांधी तीर्थ हे मात्र जल आणि पर्वत या दोन्ही मिळून बनलेले आहे. त्यामुळे ते खूप महत्त्वाचे ठरते. याठिकाणी ज्ञान मिळते आणि ज्ञान असेल तरच सेवा घडते हे मानवतेचे मूळ लक्षण होय. भगवान श्रीकृष्ण आणि महात्मा गांधी यांच्यातील साम्य दर्शविताना एकादशी, वैष्णव, वैश्य आदींचे संदर्भासहित दाखले दिलेत. प्रकृती साकार करण्यासाठी मानवतेला धरून अन्यायाला विरोध करण्यासाठी महाभारत असो की सत्याग्रह हा धागा श्रीवत्स गोस्वामी यांनी समजून सांगितला. धर्मनिरपेक्षता हा गुण भगवत गीतेतून महात्मा गांधी यांनी स्वत: आचारणात आणला असेही ते म्हणाले. हीच शिकवण गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांनीही कर्मातून आचरणात आणली. उजाड माळरानावर सिंचनातून नंदनवन फुलवले. ते स्वर्गाहून कमी नाही. आपल्या दूरदृष्टीतून पाणी, माती निसर्गाची भवरलाल जैन यांनी सेवा केली.

ओडिसा नृत्यशैलीतून मोहन लीलांची अनुभूती..
ओडिसा नृत्यशैलीतून मोहन लिलांची अनोखी प्रस्तूती नृत्यांगना विष्णुप्रिया गोस्वामी यांनी केली. ओडिसी नृत्यातून श्रीकृष्णाच्या बाललिला, गोकूळ, वृदांवनातील विविध दाखल्यांवर नृत्याभिनय सादरीकरण केले. यात ‘केळ छंद जाने लो नंद राजा राम लिया..’ या उडिया भाषेतील वनमाली रचीत रचनेवर ओडिसी नृत्य सादर केले. ही राग केदारगौड ताल गुरू सात मात्रमध्ये सादर केले. यानंतर ‘राधाराणी सांग नावे मुरलीपारो’ या गीतावर मनमोहक नृत्य केले. शेवटी ‘वैष्णव जन तो है पिर..’ या महात्मा गांधी प्रिय भजन वरूण नेवे याने गायले. त्यावर विष्णुप्रिया गोस्वामी हिने ओडिसी नृत्य प्रस्तूत केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला दीपप्रज्वलनानंतर प्रशांत सूर्यवंशी यांनी संत कबीरांची रचना सादर केली. सूत्रसंचालन नितीन चोपडा यांनी केले. आभार गिरीष कुळकर्णी यांनी मानले. राष्ट्रगीताने समारोप झाला.

Protected Content