कंडारी येथे लाच स्वीकारतांना वायरमनला अटक

भुसावळ प्रतिनिधी । मीटरमध्ये फेरफार झाल्याचे कारण दाखवून हे मीटर तपासणीला न पाठविण्यासाठी तीन हजारांची लाच स्वीकारतांना तालुक्यातील कंडारी येथे एका वायरमनला अटक करण्यात आली आहे.

याबाबत वृत्त असे की, तालुक्यातील कंडारी येथील ४० वर्षीय तक्रारदाराच्या मीटरमध्ये फेरफार करण्यात आल्याचा आक्षेप चोरवड उपकेंद्रातील वायरमन विश्‍वनाथ सोमा बाऊस्कर (वय ४८) याने घेतला होता. हे मीटर पुढील तपासणीला न पाठविण्यासाठी त्याने तीन हजार रूपयांची लाच मागितली. दरम्यान, तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. यानुसार आज एसीबीचे अधिक्षक जी.एम. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने सापळा रचला. यात पो.ना.मनोज जोशी,पोना.जनार्दन चौधरी, पो.कॉ.प्रशांत ठाकुर, प्रविण पाटील, नासीर देशमुख, ईश्‍वर धनगर यांचा समावेश होता. या पथकाने सापळा रचून आज दुपारी विश्‍वनाथ सोमा बाऊस्कर याला तीन हजार रूपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली.

Protected Content