कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात अभाविपचे ‘भोंगा’ आंदोलन !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षांच्या निकालांमधील गोंधळ, अभ्यासक्रम शुल्कवाढ आणि प्रशासकीय अनास्थेविरोधात आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) विद्यापीठासमोर ‘भोंगा आंदोलन’ करत प्रशासनाचे लक्ष वेधले. गेली ७६ वर्षांपासून शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अभाविपने विद्यापीठाच्या विविध समस्यांवर यापूर्वीही निवेदने दिली होती, मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने हे तीव्र आंदोलन करण्यात आले. सोमवारी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली.

अचानक शुल्कवाढ रद्द करा आणि भविष्यातील वाढ १०% पेक्षा जास्त नको
अभाविपने आपल्या निवेदनात प्रामुख्याने बीबीए, बीसीए, एमसीए, एमबीए आदी अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चे शुल्क कोणतीही पूर्वसूचना न देता, शैक्षणिक वर्ष संपत असताना अचानक वाढवल्याचा मुद्दा उपस्थित केला. हे शैक्षणिक शुल्क शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीस ठरल्याप्रमाणेच आकारावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीचे शुल्क नियमानुसार १०% पेक्षा अधिक वाढवू नये, अशीही मागणी करण्यात आली. ही शुल्कवाढ विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याचे अभाविपचे म्हणणे आहे.

चुकीच्या निकालांवर तातडीने कारवाईची मागणी
विद्यापीठ परीक्षांमधील अनेक विद्यार्थ्यांचे निकाल ‘अनुपस्थित’ दाखवण्यात आले आहेत, तर ते प्रत्यक्षात परीक्षेस उपस्थित होते. अशा चुकीच्या निकालांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून, विद्यापीठाने त्वरित ऑनलाइन पद्धतीने तक्रारी मागवून दोन दिवसांत सुधारित निकाल लावावा, अशी मागणी अभाविपने केली. तसेच, या चुकीच्या निकालांना जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याचीही मागणी त्यांनी केली, जेणेकरून भविष्यात अशा चुका टाळता येतील.

फोटोकॉपी-पुनर्मूल्यांकन प्रक्रियेतील अनियमितता थांबवा
फोटोकॉपी आणि पुनर्मूल्यांकनाच्या प्रक्रियेतही अनेक समस्या असल्याचे अभाविपने निदर्शनास आणून दिले. फोटोकॉपी आणि पुनर्मूल्यांकनाचा निकाल विशिष्ट कालमर्यादेतच देण्याची व्यवस्था करावी. तसेच, सर्व अभ्यासक्रमांसाठी या सेवांचे शुल्क एकसमान करावे आणि ते अवाढव्य असल्याने कमी करावे, अशी मागणी त्यांनी केली. सध्याचे शुल्क विद्यार्थ्यांवर अतिरिक्त बोजा टाकत असल्याचे अभाविपचे म्हणणे आहे.

पेपर तपासणीतील गोंधळ आणि हेल्पलाइनची दुरवस्था सुधारण्याची मागणी
अनेक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे पेपर योग्य पद्धतीने न तपासल्यामुळे व्यवस्थित पेपर लिहूनही अनेक विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले आहे. मागील परीक्षांमध्येही अशाच तक्रारी आढळल्या होत्या. यावर त्वरित उपाययोजना करत प्रत्येक विषयाच्या तज्ञ व्यक्तींकडूनच पेपर तपासले जातील याची खात्री करावी आणि मूल्यांकन व्यवस्थित होईल यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अभाविपने केली. यासोबतच, विद्यापीठाने दिलेल्या हेल्पलाइन नंबर अनेकदा चालू नसतात आणि तक्रारी करूनही त्यावर कार्यवाही होत नाही, असा आरोपही अभाविपने केला. हेल्पलाइन व्यवस्थित चालतील यासाठी आवश्यक ते कर्मचारी नेमावेत आणि तक्रारी वेळेत निवारण केल्या जातील याची खात्री करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा
वरील मागण्यांवर विद्यापीठ प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अन्यथा विद्यापीठ प्रशासनास यापेक्षाही अधिक तीव्रपणे विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिला आहे.