अमळनेरात लोकसंघर्षचा उलगुलान मोर्चा

अमळनेर प्रतिनिधी । आदिवासींच्या विविध मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी लोकसंघर्ष समितीच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली येथील प्रांताधिकारी कार्यालयावर उलगुलान मोर्चा काढण्यात आला.

पैलाड येथील शनी मंदिरापासून मोर्चा निघाला. यानंतर दगडी दरवाजा, सुभाष चौक, नगरपालिका, स्टेट बँकमार्गे बस स्टँड, महाराणा प्रताप चौकाकडून प्रांताधिकारी कार्यालयात पोहचला. प्रारंभी जिजाऊ गेटजवळच आंदोलकांनी ठिय्या मांडला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. प्रतिभा शिंदे यांनी मार्गदर्शन केले. यानंतर प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्या कार्यालयात बैठक सुरू झाली. त्यात चोपडा व अमळनेर तालुक्यातील विविध मागण्यांसाठी चर्चा झाली.

वनहक्क कायद्याची जनपक्षीय अंमलबजावणी करा, वन विधेयक १९२७ मधील सुधारणा विधेयक मागे घ्या, सर्व शेतकर्‍यांना मान्य केल्याप्रमाणे दुष्काळी अनुदान त्वरित अदा करा, स्वाभिमान सबळीकरण योजनेअंतर्गत तात्काळ भूमिहीन आदिवासींना जमिनी द्या, वन पाडे महसूल करा, वन जमीनधारकांना तात्काळ सातबारा देण्यात यावा, अतिक्रमण जमिनीवर असलेले घर तात्काळ नियमनाकुल करावीत, सर्व गावांना स्मशानभूमी उपलब्ध करून द्यावी. ठक्कर बाप्पा योजनेच्या निधी सर्व गावांना वाटप करण्यात यावा. त्या निधीची व योजनांची माहिती गावनिहाय द्यावी, मोटरसायकल असणार्‍या लोकांना रेशन बंद ही जाचक अट रद्द करावी आदी मागण्यांवर चर्चा झाली. या मागण्यांवर अंमलबजावणीचे आश्‍वासन दिल्यानंतर हा मोर्चा थांबला.

दरम्यान, सर्व शेतकर्‍यांना दुष्काळ नुकसानभरपाई प्रांताधिकार्‍यांकडे वर्ग न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचा इशारा प्रतिभा शिंदे यांनी दिला.

Protected Content