पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील लासगाव येथील एका हातमजुराने राहत्या घरात गळफास घेत आपली जीवन यात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना घडली असून घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, “लासगाव ता. पाचोरा येथील गौतम विरभान लोखंडे (वय – २८) या हातमजुराने आज मंगळवार, दि. ९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आर्थिक विवंचनेतून गळफास लावत आपली जीवन यात्रा संपवली. पत्नी जळगांव येथे माहेरी, आई व वडिल हातमजुरीला गेलेले असतांना घरात कोणीही नसल्याने गौतम लोखंडे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
मयताचे शवविच्छेदन पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी केले. गौतम लोखंडे यांच्या पाश्चात्य आई, वडिल, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.