जुन्या वादातून तरूणाचा धारदार शस्त्राने वार; चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तांबापूरा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरूणावर चौघांनी धारदार चाकूने वार करीत गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी ६ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शिरसोली नाका येथे घडली. याप्रकरणी मंगळवारी ७ मे रोजी दुपारी ३ वाजताएमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील शिरसोली नाका परिसरातील तांबापूरा परिसरात विजय अशोक शिंदे (वय २०, रा. शिरसोली नाका) हा तरुण वास्तव्यास आहे. सोमवारी ६ मे रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास दादू रतिलाल कोळी, डुबऱ्या उर्फ मयूर, दीपक रतीलाल कोळी व भरत बापू कोळी सर्व रा. हरीविठ्ठल नगर यांनी जून्या भांडणाच्या कारणावरुन विजय शिंदे याच्यासोबत वाद घातला. तसेच दादू कोळी याने विजयला तुला जास्त झाली आहे, तेरा तारखेला पण माझ्याशी भांडण केले होते. चल आपण आज फैसला करुन टाकू, असे बोलून त्याने कमरलेला खोचलेला चाकू काढून विजयच्या डोक्यावर वार केला. यावेळी त्याच्यासोबत असलेल्यांनी देखील त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. दरम्यान, विजय शिंदे याने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर मंगळवारी ७ मे रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे हे करीत आहे.

Protected Content