धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । हनुमान नगरात शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्याच्या कारणावरून तरुणाला ६ जणांकडून चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून हातातील ब्रेसलेटचे नुकसान केल्याची घटना घडली आहे. या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश देवा महाजन (वय-२९, रा.हनुमान नगर धरणगाव) हा तरुण हात मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्याच्या घराच्या समोर उभा असताना गल्लीत राहणारा दीपक रतन वाघ यांनी शिवीगाळ केली. याचा जाब योगेश याने विचारला. याचा राग आल्याने संशयित आरोपी दीपक रतन वाघ, कैलास रतन वाघ, तुषार रतन वाघ, संघर्ष वाघ, मंगलाबाई रतन वाघ आणि सृष्टी दीपक वाघ सर्व रा. हनुमान नगर यांनी योगेश महाजन या तरुणाला लोखंडी रॉड, लाकडी दांडा याने मारहाण केली, तर त्याच्या आई-वडील व पत्नीला देखील शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. यामध्ये त्याच्या हातातील २१ ग्राम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट गहाळ झाले आहे हा प्रकार घडल्यानंतर योगेश महाजन याने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता ६ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक प्रमोद पाटील करीत आहे.