जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथे एका तरुणाला लोखंडी स्टीलच्या कळेने बेदम मारहाण करून दुखापत केली, तर त्याच्या आईवडीलांना देखील धक्काबुक्की करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, कमलाकर प्रभाकर महाजन (वय 33, रा.
वरची अळी नशिराबाद) हा तरुण आपले आई-वडील यांच्यासह वास्तव्याला आहे. शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास कमलाकर महाजन हा गावातील बसस्टँड जवळील दुकानासमोर पायरीवर बसलेला होता. त्यावेळी गावात राहणारा जयेश रमेश महाजन हा तिथे आला. त्यामध्ये जुन्या वादातून जयेश महाजन याने कमलाकर महाजन याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरडाओरड केली, या आवाजामुळे कमलाकर महाजन याची आई आणि वडील घटनास्थळी आले. त्या ठिकाणी देखील तरुणाला हातातील लोखंडीकळे मारून दुखापत केली. तर त्याच्या आई-वडिलांना ढकलून दिले आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर कमलाकर महाजन याने नशिराबाद ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले. त्यानंतर शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी जयश रमेश महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल नूर खान करीत आहे.