जळगावात वयोवृध्द महिलेची सोन्याची पोत लांबविणाऱ्यास अटक

जळगाव प्रतिनिधी । मोफत साडी व बांगड्या मिळत असल्याचे सांगून वयोवृध्द महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत लंपास करणाऱ्या भामट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी पुढील कारवाईसाठी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, १५ फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारा शहरातील फुले मार्केटच्या बाजुला मसाला गल्लीत भोलाराम तेल भंडार दुनाकाजवळ एका ७२ वर्षीय वयोवृध्द महिलेस अनोळखी व्यक्तीने सांगितले की गरीब महिलांना साड्या वाटप असून 251 रूपये देवून बांगड्यापण भरत आहोत. तरी तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि चप्पल काढून पिशवीत ठेवा असे सांगून महिलेने पोत व चप्पल काढून पिशवीत टाकली. त्यानंतर त्या महिलेला एका ठिकाणी बसविण्यास सांगितले. त्यानंतर तो व्यक्ती फरार झाला होता. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे वयोवृध्द महिलेच्या लक्षात आल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांनी पथक तयार केले. पथकाली स.फौ. अशोक महाजन, नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, सुनिल दामोदरे, मनोज दुसाने, किरण चौधरी, प्रविण हिवराळे, परेश महाजन यांना रवाना केले. दरम्यान पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार धुळे शहरातून संशयित आरोपी अशोक सुरेश दहेकर (वय-४०) रा. मोगलाई धुळे याला अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातील चोरीस गेलेली सोन्याची पोत हस्तगत केली आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीस शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content