


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी। तालुक्यातील रुंधाटी गावात जुन्या वादातून एका शेतकऱ्याला लोखंडी रोडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी १५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी १७ मे रोजी दुपारी अडीच वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, अतुल शिवाजी पवार वय-४०, रा. रुंधाटी ता. अमळनेर हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान बुधवारी १५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता जुन्या वादातून गावात राहणारे गणेश भास्कर पवार, भास्कर गोविंदा पवार, संजय गोविंदा पवार, भावेश संजय पवार सर्व रा. रुंधाटी ता. अमळनेर यांनी अतुल पवार याला लोखंडी रॉडने हातावर, पायावर मारून गंभीर दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर अतुल पवार यांनी शुक्रवारी १७ मे रोजी दुपारी अडीच वाजता अमळनेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार मारहाण करणारे गणेश भास्कर पवार, भास्कर गोविंदा पवार, संजय गोविंदा पवार आणि भावेश संजय पवार या चार जणांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील करीत आहे.



