पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हडपसर येथील मार्व्हल बाउंटी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये एका महिलेने आपल्या फ्लॅटमध्ये तब्बल ३५० मांजरी पाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाच घरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर मांजरी आढळून आल्याने सोसायटीमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून पुणे महापालिकेच्या पशू संवर्धन विभागाने सदनिकाधारकास ४८ तासांत मांजरी हलविण्याची नोटीस बजावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्व्हल बाउंटी सोसायटीच्या नवव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये मागील पाच वर्षांपासून तब्बल ३५० मांजरी पाळल्या जात होत्या. मांजरींची देखभाल करण्यासाठी त्या महिलेकडून पाच ते सहा कामगार नियुक्त करण्यात आले होते. मात्र, मांजरीच्या विष्ठेचा वास आणि सततच्या आवाजामुळे इतर रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. सोसायटीमधील रहिवाशांनी या समस्येविरोधात संबंधित महिला मालकाकडे वारंवार तक्रार केली होती. मात्र, तिने कोणतीही दखल घेतली नाही. अखेर, रहिवाशांनी पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देण्याचा प्रयत्न केला असता, सदनिकाधारकाने त्यांना प्रतिसाद दिला नाही.
यानंतर हडपसर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन फ्लॅटची पाहणी केली असता, ३५० मांजरी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे, महापालिकेच्या पशू संवर्धन विभागाने सदनिकाधारकास ४८ तासांत मांजरी हलविण्याची नोटीस बजावली. सोसायटीच्या रहिवाशांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला असून सार्वजनिक आरोग्यासाठीही हा प्रकार धोकादायक असल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, महापालिकेने याप्रकरणी कठोर पावले उचलण्याचा इशारा दिला आहे