जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केवळ गणवेशापुरतेच नव्हे, तर संपूर्ण जीवन राष्ट्रसेवेसाठी समर्पित करणारे माजी सैनिक प्रविण संतोष पाटील (रा. शिवराणा नगर, पिंप्राळा) यांनी एक अत्यंत प्रेरणादायी कृत्य केले आहे. त्यांच्या सुकन्या चि.सौ. कां. प्रियंका यांचा साखरपुडा आज, ११ मे रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या आनंददायी सोहळ्यात मिळालेल्या तब्बल १ लाख दोन हजार रुपयांची भेट रक्कम त्यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमध्ये जमा केली आहे.
देशासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या शूर जवानांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने योगदान द्यावे, या उदात्त विचारातून पाटील कुटुंबीयांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यांच्या या असामान्य राष्ट्रप्रेमाच्या कृतीमुळे समाजाला एक नवीन दिशा मिळाली आहे.
जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (डॉ.) निलेश प्रकाश पाटील (निवृत्त) यांनी माजी सैनिक प्रविण पाटील यांच्या या उदात्त भावनेचा गौरव केला. त्यांनी पाटील यांना सन्मानपूर्वक पावती प्रदान केली आणि त्यांच्या कार्याचे कौतुक केले. याप्रसंगी मेजर (डॉ.) पाटील यांनी नववधू आणि वरांना त्यांच्या पुढील सुखी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच, समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमध्ये उदार मनाने योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
माजी सैनिक प्रविण पाटील यांच्या या प्रेरणादायी कार्याची दखल राज्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनीही घेतली असून, त्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. प्रविण पाटील यांच्या या कृतीतून ‘सुखाचे क्षणही देशासाठी’ समर्पित करता येतात, हा महत्त्वपूर्ण संदेश समाजात सर्वदूर पोहोचला आहे. त्यांचे हे कार्य निश्चितच इतरांनाही देशसेवेच्या कार्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करेल.