Home Cities बुलढाणा ‘बेटी बढाओ, बेटी पढाओ’चा अनोखा संदेश; मुलीला चक्क उंटावर बसवून वडिलांनी पोहोचवले...

‘बेटी बढाओ, बेटी पढाओ’चा अनोखा संदेश; मुलीला चक्क उंटावर बसवून वडिलांनी पोहोचवले शाळेत

0
8


खामगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ‘बेटी बढाओ, बेटी पढाओ’ आणि ‘मेरी बेटी मेरा अभिमान’ या संदेशाला खामगावातील एका वडिलांनी अनोख्या पद्धतीने प्रत्यक्षात उतरवले आहे. मुलीच्या शिक्षणाचा उत्सव साजरा करत सामाजिक कार्यकर्ते रवि जोशी यांनी आपल्या लाडक्या मुलीला चक्क उंटावर बसवून मोठ्या उत्साहात शाळेत पोहोचवले. या आगळ्यावेगळ्या उपक्रमातून त्यांनी समाजासमोर मुलींच्या शिक्षणाचा सकारात्मक संदेश दिला आहे.

यावर्षी उन्हाच्या तीव्रतेमुळे उन्हाळी सुट्ट्या लांबल्या होत्या. त्यानंतर ३० जून रोजी विदर्भातील शाळांचे नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले. खामगाव शहरातील सराफा भागात राहणारे सामाजिक कार्यकर्ते रवि जोशी यांची कन्या शिप्रा रवि जोशी हिने पाचव्या वर्गात यश संपादन करून सहाव्या वर्गात प्रवेश घेतला. शाळेच्या पहिल्या दिवशी तिचा प्रवेश खास पद्धतीने स्मरणीय करण्याचा निर्णय वडिलांनी घेतला.

मागील वर्षीप्रमाणे यंदाही रवि जोशी यांनी मुलीला औक्षण करून तिचे स्वागत केले आणि त्यानंतर तिला उंटावर बसवून शाळेकडे रवाना झाले. उंटावर बसलेली शिप्रा आणि तिच्यासोबत चालणारे वडील हे दृश्य पाहण्यासाठी रस्त्यावर नागरिकांची गर्दी झाली. अनेकांनी या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ काढून या उपक्रमाचे कौतुक केले.

मुलीच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या या अभिनव उपक्रमामुळे परिसरातील नागरिक तसेच शाळेतील शिक्षकांनी रवि जोशी यांचे विशेष कौतुक केले. केवळ मुलगा नव्हे तर मुलगीही कुटुंबाचा अभिमान असून तिच्या शिक्षणासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा खरा अर्थ समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा सकारात्मक उपक्रमांची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. मुलीच्या शाळेतील पहिल्या दिवसाला खास बनवून रवि जोशी यांनी पालकांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. खामगावातील या अनोख्या उपक्रमातून मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा आणि समाजात सकारात्मक विचार रुजवण्याचा संदेश देण्यात आला असून, वडिलांचे हे प्रेम आणि पाठबळ अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.


Protected Content

Play sound