शेतातून लोखंडी गेट व लोखंडी जाळ्यांच्या बंडलांची चोरी करणाऱ्या संशयिताला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव तालुक्यातील विटनेर शिवारातील शेत गट क्रमांक ५८ मधील शेतातून लोखंडी गेट आणि लोखंडी जाळी असा एकुण ६० हजार ५०० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विटनेर गावातून रविवारी ३१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता अटक केली. अशी माहिती जिल्हा पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाने सोमवारी १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. समाधान अशोक गायकवाड वय २८ रा. विटनेर ता. जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

भरत अभिमन पाटील वय ३४ रा. खेडी खुर्द ता. जळगाव हे कॉन्ट्रॅक्टर आणि शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे जळगाव तालुक्यातील विटनेट शिवारातील शेत गट क्रमांक ५८ मध्ये काम सुरू होते. त्याठिकाणी त्यांनी २०० किलो वजनाचे लोखंडी गेट आणि लोखंडी जाळ्याचे बंडल असा एकुण ६० हजार ५०० रूपयांचा मु्देमाल १८ मार्च रोजी ठेवलेला होता. दरम्यान हा मुद्देमाल चोरून नेल्याचे गुरूवारी २८ मार्च रोजी सकाळी १० वाजता उघडकीला आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे फिरविली. मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार ही चोरी विटनेर गावातील समाधान अशोक गायकवाड याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने रविवारी ३१ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी समाधान गायकवाड याला विटनेर गावातून अटक केली. त्याने चोरी केलेला मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला.

यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावीत, एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल मोरे, पोउनि गणेश चौभे, स.फौ. अनिल जाधव, पोहेकॉ सुनिल दामोदरे, प्रविण मांडोळे, हेमंत पाटील, बबन पाटील, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर यांनी केली.

Protected Content