भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस पाटलाला मारहाण

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वडली येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस पाटलाला मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप प्रकाश पाटील (वय-३८) रा. वडली ता.जि. जळगाव हे गावचे पोलीस पाटील म्हणून काम पाहतात. मंगळवार ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता गावात काहीजणांचे भांडण सुरू होते. त्यामुळे पोलीस पाटील दिलीप पाटील हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करीत होते. याचा राग आल्याने गजानन सुभाष पाटील आणि सुभाष पुंडलिक पाटील दोन्ही रा. वडली ता.जि.जळगाव यांनी पोलीस पाटील दिलीप पाटील यांना शिवीगाळ व मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात पोलीस पाटील दिलीप पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा प्रकरणी संशयित आरोपी गजानन सुभाष पाटील आणि सुभाष पुंडलिक पाटील यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे हे करीत आहे.

Protected Content