रावेर प्रतिनिधी | तालुक्यातील पाल येथील एक शासकीय कर्मचारी शेरीनाका सिमेवरुन रात्रपाळीची ड्युटी करून मोटारसायकलने घरी परत जात असतांना तरसाने अचानक त्यांच्या वाहनाला धडक दिल्यामुळे ते जखमी झाल्याची घटना आज (दि.१५) सकाळी १०.०० च्या सुमारास घडली.
या बाबत अधिक माहिती अशी की, पाल येथील स्थानिक सर्व्हेक्षण पथकाचे कर्मचारी विश्वासराव पंडित पवार हे महाराष्ट्र मध्य प्रदेश सिमेवर असणा-या शेरीनाक्याहून महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणूक ड्युटी करून घरी परत जात असतांना सहस्रलिंग गावाजवळ तरस या हिंस्र प्राण्याने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिल्याने ते खाली पडून जखमी झाले आहेत. त्यांना जखमी अवस्थेत रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी. बारेला यांनी त्यांच्यावर उपचार केले. याबाबत माहिती मिळताच निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले, नायब तहसीलदार चंदू पवार, डॉ. संदीप पाटील, अजित तडवी यांनी जखमी पवार यांची भेट घेऊन विचारपूस केली.