आ. शिरीष चौधरी यांनी घेतला महा कृषी ऊर्जा अभियानात सहभाग

 

जळगाव प्रतिनिधी । महा कृषी ऊर्जा अभियानात रावेरचे आमदार शिरीष चौधरी यांनीही सहभाग घेऊन दोन कृषिपंपांचे 95 हजार रुपयांचे वीज बिल भरले.

 

कृषिपंपांच्या वीजबिलांत भरघोस सवलत देणारे महा कृषी ऊर्जा अभियान शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. सर्व शेतकऱ्यांनी या अभियानात वीजबिल भरून थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन आमदार चौधरी यांनी केले आहे.

 

या अभियानात कृषिपंपाच्या एकूण थकबाकीमध्ये तब्बल 66 टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. निर्लेखन, व्याज व विलंब आकारामध्ये सूट दिल्यानंतर राहिलेल्या सुधारित थकबाकीपैकी पहिल्या वर्षात 50 टक्के थकबाकी भरल्यास वीजबिल कोरे करण्याची शेतकऱ्यांना संधी आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या थकीत व चालू वीजबिलांद्वारे भरणा झालेल्या रकमेपैकी प्रत्येकी 33 टक्के निधी हा संबंधित ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रात कृषी वीजयंत्रणेच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.

 

रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीषदादा चौधरी यांनीही या अभियानात सहभाग घेऊन शेतकऱ्यांना वीजबिल भरण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. त्यांच्या खिरोदा व कुंभारखेडा येथील दोन कृषिपंपांचे एक लाख 56 हजार 480 रुपये वीजबिल होते. महा कृषी ऊर्जा अभियानाचा लाभ घेतल्याने त्यांना चालू बिलांसह केवळ 95 हजार रुपये भरावे लागले आहेत. या रकमेचा धनादेश त्यांनी महावितरणच्या सावदा विभागाचे कार्यकारी अभियंता गोरक्षनाथ सपकाळे यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द केला. केवळ बिलात सवलतच नव्हे तर कृषिपंपांना लागणाऱ्या विजेच्या पायाभूत सुविधा विकसित करणारे हे अभियान आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या अभियानात आपली वीजबिले भरून थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन आमदार शिरीषदादा चौधरी यांनी केले आहे.

Protected Content