
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमेरिकेत भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्याचा कथित अवमान झाल्याच्या घटनेविरोधात जळगावात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. सै. नियाज अली भैय्या फाऊंडेशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन सादर करून संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदविला.

निवेदनात म्हटले आहे की, भारताने आपल्या महान आणि प्राचीन संस्कृतीच्या परंपरेनुसार नेहमीच जगातील सर्व देशांचा व त्यांच्या राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान केला आहे. भारतीय नागरिकांनी कधीही कोणत्याही देशाच्या राष्ट्रध्वजाचा अवमान केला नसून प्रत्येक राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचा आदर राखला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेत भारतीय तिरंग्याचा कथित अवमान झाल्याची घटना समोर आल्याने भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेतील एका सार्वजनिक ठिकाणी एका व्यक्तीने भारतीय तिरंगा फाडून जमिनीवर फेकत त्याचा अवमान केल्याचा प्रकार घडला. राष्ट्रध्वज हा देशाच्या अस्मितेचे आणि गौरवाचे प्रतीक असल्याने या घटनेमुळे स्वातंत्र्यासाठी आणि राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचेही अपमान झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणात भारत सरकारने गांभीर्याने दखल घेऊन अमेरिकन प्रशासनाकडे अधिकृतरीत्या भूमिका मांडावी, तसेच संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. भारतीय नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने या विषयावर आवश्यक पावले उचलावीत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
यावेळी “तिरंगे का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान” आणि “हमसे जो टकराएगा वह मिट्टी में मिल जाएगा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. उपस्थितांनी भारतीय राष्ट्रध्वजाविषयीची आपली निष्ठा व्यक्त करत दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. निवेदन सादर करताना सै. अयाज अली नियाज अली, हाजी शकूर बादशाह, सय्यद जावेद, शफी ठेकेदार, सय्यद उमर, कामील खान, शफीक अहमद यांच्यासह फाऊंडेशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून त्यांनी या प्रकरणात केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली.



