


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील नागरिकांना परवडणाऱ्या दरात हाय-स्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने नवीन ग्रामीण फायबर एंट्री प्लॅन सादर केला आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील ग्राहकांना केवळ 259 रुपये प्रतिमहिना दरात ब्रॉडबँड इंटरनेट सुविधा मिळणार आहे.
BSNL च्या या नवीन योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील डिजिटल कनेक्टिव्हिटी मजबूत करणे हा आहे. भारतनेट (Bharat Net) उपक्रमांतर्गत समाविष्ट होणाऱ्या गावांमधील ग्राहकांसाठी हा प्लॅन उपलब्ध करण्यात आला आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी, व्यावसायिक तसेच ऑनलाइन सेवा वापरणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. या फायबर एंट्री प्लॅनमध्ये ग्राहकांना दरमहा 700 GB हाय-स्पीड डेटा सुविधा मिळणार असून इंटरनेट स्पीड 25 Mbps पर्यंत उपलब्ध राहणार आहे. डेटा मर्यादा पूर्ण झाल्यानंतरही ग्राहकांना इंटरनेट वापरता येणार आहे. यासोबतच अमर्यादित व्हॉइस कॉलिंगची सुविधाही या प्लॅनमध्ये देण्यात आली आहे.
ग्राहकांना या योजनेत मोफत इन्स्टॉलेशन आणि ONT/मॉडेम सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच मनोरंजनासाठी Waves OTT सबस्क्रिप्शनचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कमी खर्चात इंटरनेट, कॉलिंग आणि डिजिटल मनोरंजन अशा अनेक सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना BSNL च्या ग्रामीण फायबर सेवेसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. ग्राहकांना ग्रामीण FTTH सेवेशी संबंधित संकेतस्थळावरून बुकिंग करता येईल. तसेच अधिक माहितीसाठी BSNL ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
BSNL महाराष्ट्र सर्कलचे मुख्य महाव्यवस्थापक यांनी सांगितले की, प्रत्येक गावकऱ्याला हाय-स्पीड आणि विश्वासार्ह ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी मिळावी, यासाठी BSNL कटिबद्ध आहे. ग्रामीण भारताला डिजिटलदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने ही योजना महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. कमी किमतीत हाय-स्पीड इंटरनेट, अमर्यादित कॉलिंग आणि डिजिटल सुविधांचा लाभ आता ग्रामीण भागातील नागरिकांनाही मिळणार असून BSNL चा 259 रुपयांचा फायबर प्लॅन ग्रामीण डिजिटल क्रांतीला नवी चालना देणार आहे.



