


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) क्षेत्रात गुगलने आणखी एक मोठी झेप घेतली आहे. गुगलने आपले नवीन Nano Banana 2 Lite AI मॉडेल सादर केले असून, हे मॉडेल अवघ्या 4 सेकंदांत AI फोटो तयार करण्याची क्षमता असल्याचा कंपनीचा दावा आहे. वेग, कमी खर्च आणि मोठ्या प्रमाणात कंटेंट निर्मिती यासाठी हे मॉडेल विशेषतः विकसित करण्यात आले आहे.
गुगलच्या माहितीनुसार, Nano Banana 2 Lite हे आतापर्यंतचे सर्वात वेगवान आणि किफायतशीर AI मॉडेलपैकी एक आहे. ज्या ठिकाणी वापरकर्त्यांना जास्त विचारक्षमतेपेक्षा जलद परिणामांची गरज असते, अशा कामांसाठी हे मॉडेल उपयुक्त ठरणार आहे. या AI मॉडेलची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची वेगवान इमेज जनरेशन क्षमता. वापरकर्त्याने दिलेल्या टेक्स्ट कमांडच्या आधारे हे मॉडेल जवळपास 4 सेकंदांत फोटो तयार करू शकते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर AI इमेज तयार करणारे कंटेंट क्रिएटर्स, डिझायनर्स आणि डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील लोकांसाठी हे फायदेशीर ठरू शकते.
गुगलने Nano Banana 2 Lite हे विशेषतः जलद व्हिज्युअल आयडिया तयार करणे, प्रोटोटाइप बनवणे, मोठ्या प्रमाणात AI इमेज जनरेट करणे आणि कंटेंट निर्मिती यांसारख्या कामांसाठी तयार केले आहे. फक्त वेग नाही तर गुणवत्तेवरही या मॉडेलमध्ये भर देण्यात आला आहे. गुगलच्या मते, Nano Banana 2 Lite इमेजमधील टेक्स्ट योग्य पद्धतीने हाताळण्यास सक्षम आहे. त्यामुळे अधिक स्पष्ट आणि दर्जेदार AI फोटो तयार करता येणार आहेत.
AI इमेज निर्मितीची गरज असलेल्या वापरकर्त्यांसाठी हे मॉडेल कमी खर्चात मोठ्या प्रमाणावर काम करण्याचा पर्याय देणार आहे. तर Nano Banana 2 हे अधिक दर्जेदार फोटो, चांगली स्पीड आणि संतुलित वापरासाठी तयार करण्यात आले आहे. AI क्षेत्रातील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत असताना गुगल आपल्या AI मॉडेल्सध्ये सातत्याने सुधारणा करत आहे. Nano Banana 2 Lite मुळे AI फोटो निर्मिती अधिक वेगवान, सोपी आणि किफायतशीर होण्याची शक्यता आहे.



